काश्‍मीर अजून जिंकायचे आहे

Article-370-Cancel
Article-370-Cancel

संपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे.

जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का? जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का? काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर प्रहार करत असतात, असा उपखंडाचा एक भाग एवढे जगाला ठाऊक असेल. त्यांच्यातील संघर्षाचा स्तर बहुतेक वेळा इतरांसाठी अदखलपात्र असतो; मात्र अगदी क्वचित तो आण्विक धमक्‍यांच्या स्तरावर गेल्यानंतर नकाशा शोधण्यासाठी या सगळ्यांची धावपळ उडते.

आता महत्त्वाच्या प्रत्येक देशाने आपापल्या परीने काश्‍मीरबाबत वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्‍नांची संक्षिप्त उत्तरे असलेली प्रारंभिक वही तयार केली आहे, हे मात्र खरे. या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कदाचित सर्वोत्तम उदाहरण नाही. जुलैमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेली टिप्पणी मात्र लक्षणीय ठरते. काश्‍मीर हे असे सर्वांत सुंदर ठिकाण आहे; की जिथे आता सर्वत्र बाँबस्फोट होत आहेत, असे वर्णन त्यांनी केले होते. त्यांचा मेंदू तपशिलाच्या अडगळीपासून आणि संस्थात्मक स्मृतींच्या ओझ्यापासून मुक्त आहे.

त्यांचे सामान्य ज्ञान अगदी यूपीएससीच्या स्तरावरचे नाही, म्हणूनच त्या टिप्पणीतून उघड झाले, की फेब्रुवारीत पुलवामा हल्ला झाल्यानंतरच काश्‍मीरचा मुद्दा पहिल्यांदाच त्यांच्या मनात आला. तुम्ही नोंदी तपासून पाहिल्यास दिसेल, की त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात काश्‍मीरमध्ये झालेला हा एकमेव मोठा बाँबस्फोट होता.
त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा? हाच की भारताच्या सर्वोत्तम सामरिक आणि राजकीय हिताच्या दृष्टीने; काश्‍मीरबाबत कोणतीही बातमी नसणे, हीच चांगली बातमी असते. सिमला करारानंतर उलटलेल्या अनेक दशकांत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह सर्व पंतप्रधानांनी काश्‍मीरबाबत थंड राहण्याचेच धोरण अवलंबले. ९/११ नंतर पाकिस्तानी लष्कर प्रशासनाला पुन्हा मंतरलेला ताईत मिळाला आणि अमेरिकने पुन्हा लाड सुरू केले. त्यानंतरही काश्‍मीरवर चर्चा होत नव्हती.

मोदी सरकारच्या काळात भारताने काश्‍मीरबाबतचे योगायोगाने अनपेक्षित लाभ धोरण मोडीत काढून ‘जैसे थे’ भूमिका सोडून दिली, असे म्हणण्याचा मोह कदाचित होईल. हे खरे असले तरी, मोदी सरकारनेच हे पहिल्यांदा केले, असे मुळीच नाही. काश्‍मीर मुद्द्यातील जोर ओसरून जात असल्याने निराश झालेल्या पाकिस्तानी शासकांची सुरवातीला २६/११ आणि नंतर मोदीकाळात पठाणकोट व पुलवामा घडवून आणले. त्यापैकी एकही हल्ला स्थानिकांनी घडवून आणल्याचे कोणीही म्हणणार नाही. कोणत्याही मार्गाने युद्धसदृश स्थिती निर्माण करणे, अणुहल्ल्याच्या धमक्‍या देणे आणि जगात घबराट पसरल्यावर मुख्य मुद्‌द्‌याकडे बोट दाखवणे, असा पाकिस्तानचा दृष्टिकोन होता.

काश्‍मीरमध्ये आता काय घडणार, याबाबत अमेरिकेसह अन्य अनेक देशांना चिंता वाटते. तेथे नरसंहार सुरू असल्याच्या इम्रान खान यांच्या वक्तव्यावर कोणाचाही विश्‍वास नाही. त्याचप्रमाणे श्रीनगरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे दाखवणाऱ्या ड्रोनने टिपलेल्या छायाचित्रांमुळे कोणालाही फारसा दिलासा मिळालेला नाही. खोऱ्यात जबरदस्तीने निर्बंध लादण्यात आले असून, आरोप न ठेवता अथवा गुन्हे न नोंदवता हजारोंना स्थानबद्ध केल्याची भावना आहे.

संयुक्त राष्ट्रे सप्ताह समाप्त झाला आहे. आता मुत्सद्देगिरीचा विजय झाल्याबद्दल आणि पाकिस्तानला एकाकी पाडल्याबद्दल विजयोत्सव साजरे होतील. न्यूयॉर्कहून मोदी परत येतील तेव्हा त्यांच्या खात्यात जमेच्या नोंदी खर्चाहून अधिकच असतील. ‘काश्‍मीर ही भारताची अंतर्गत बाब आहे’, या आपल्या जुन्या धोरणाला आव्हान मिळालेच नाही. मोदींसोबत झालेल्या चर्चेची माहिती ट्रम्प यांनी व्हाइट हाउसला दिली.

त्या वेळीही त्यांनी मोदी यांना परिस्थिती पूर्ववत करण्यास आणि काश्‍मिरी जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यास सांगितले. ५ ऑगस्टपूर्वीची स्थिती पुन्हा आणावी, असे त्यांनी म्हटले नाही. काश्‍मीरमधील नव्या घडामोडींनी पाकिस्तानला आपण बळी आणि वंचित असल्याचे दाखवून पुन्हा जगाचे लक्ष वेधून घेण्याची संधी मिळाली आहे, हेही तेवढेच खरे.

दरम्यान, काश्‍मीरमधील संपर्क व्यवस्थेवरील निर्बंधांना दोन महिने पूर्ण होतील. आधीच ताणले गेलेले निर्बंध उठवण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मीरमधील संताप खदखदू लागला आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यात उशीर झाल्यास उद्रेक, हिंसाचार आणि रक्तपाताच्या धोक्‍यात वाढ होईल, अशी परिस्थिती अनेकदा नियंत्रणाबाहेर जाते. काश्‍मीरबाबत जगाने प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत; मात्र त्याला जाणीव झाली आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे. म्हणूनच, ५ ऑगस्टनंतरची ‘जखडबंद’ स्थिती म्हणजे ‘नवसामान्य’ किंवा ‘नूतन जैसे थे’ आहे, असे समजणे अरिष्टाला आमंत्रण देणारेच ठरेल.
(अनुवाद - विजय बनसोडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com