खरडपट्टी काढताय? जरा जपून!

child
child

बालक-पालक

मुलांचं कौतुक करतानाही जरा जपूनच करावं लागतं, मग खरडपट्टीही जपूनच काढावी लागणार! सुजाण पालक व्हावं कसं, हे उलगडताना मीच दिलेला हा एक प्रसंग इथे उद्‌धृत करतो.

अगदी साधा प्रसंग. तुम्ही मुलीला दुधाचा ग्लास दिला आहे. एक चांगली गोष्ट आहे, दूध ती अगदी आवडीने पिते. त्यासाठी तिच्या मागं लागावं लागत नाही. पण, होतं काय, बिचारीच्या हातून दूध सांडतं. टेबलभर पसरतं. आई या नात्यानं तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया काय असंल? "कार्टे.... सांडलंस ना दूध! नुसती घाई घाई... जरा दम नसतो बघ तुला...' न राहवून कदाचित एखादा रट्टाही! हे सर्वसाधारण पालकत्व झालं. यात सुजाणता कुठं जाणवते? ती दिसावी, असावी असं खरंच वाटत असलं, तर पुढच्या वेळी (हो, पुन्हा कधी तरी येईलच ती वेळ!) जरा वेगळं वागून पाहा. "च्‌-च्‌-च--- सांडलंस ना दूध,' ही हळहळ व्यक्त करा आणि पहिली गोष्ट म्हणजे ते पुसण्यासाठी तिला फडकं द्या.... टेबल पुसायला मदत करा.चुकलेल्या मुलीकडं नव्हे, सांडलेल्या दुधाकडं लक्ष द्या.

दुसरी गोष्ट, दुसऱ्या ग्लासमध्ये तिला दूध द्या. असं वागणं सोपं, स्वाभाविक नाहीय... पण, शक्‍य नक्कीच आहे. इथला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ओरडलं, रट्टा दिला, तरच पुढच्या वेळी ती दूध न सांडण्याची काळजी घेईल, हा विचार मुळात चुकीचा आहे. कदाचित असा काही विचार तुमच्या मनात नसेलही त्या वेळी, केवळ एक प्रतिक्रिया म्हणून रट्टा देऊन तुम्ही मोकळे झाला असाल! हे टाळणंच शहाणपणा.

मुलं जेव्हा काही सांडतात, काही फोडतात, खरं तर फोडतात हा शब्दही चुकीचा आहे. त्यांच्या हातून काही फुटतं, तेव्हा आपलं चुकलंय, पुन्हा असं होता कामा नये, हे त्यांनाही कळत असतंच. आपण ते खरमरीत शब्दांत सुनावलं नाही, तर मुलं सारखंच काही तोडत-फोडत राहतील, असं समजू नका... "कार्ट्या, अक्कल नाही तुला? सारखं काहीतरी फोडत असतोस,' असं तर मुळीच सुनावू नका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com