शिक्षण महत्त्वाचं; पण प्रत्येकासाठी नव्हे!

शिवराज गोर्ले
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
प्रत्येकानं शाळेत जायलाच हवं का? सर्वच पालक याचं उत्तर ‘हो’ असंच देतील, मात्र अजिबात शाळेत न जाता उत्तम ‘शिकणारी’ काही मुलं मला माहीत आहेत. तरीही ती अपवाद समजुयात. शाळेत जायलाच हवं, पण पुढं कॉलेजमध्ये, मग विश्‍वविद्यालयात, शक्‍य तर परदेशात ‘उच्च शिक्षण’ द्यायलाच हवं का? आणि तेच ध्येय ठेवून शालेय जीवनात अभ्यास, परीक्षा, गुण मिळविणं हे सारं करायला हवं का? प्रथम हे तर मान्य करू या, शिक्षण दोन प्रकारचं असतं, एक ‘होणारं’ अर्थात नैसर्गिक शिक्षण. जे अनुभवाच्या आधारे होत असतं. हे शिक्षण आयुष्यभर सुरूच असतं. दुसरं असतं, ‘करावं’ लागणारं ‘शिक्षण’. या शिक्षणासाठी ‘शाळा’ असतात. हे शाळेतलं शिक्षण ही नक्कीच महत्त्वाचं असतं, पण प्रत्येकासाठी नाही! इतिहास तरी हेच सुचवितो. ज्याच्या क्रांतिकारक शोधानं विसाव्या शतकाचा चेहरामोहरा बदलला, त्या थॉमस अल्वा एडिसनला ‘बुद्धू’ आणि ‘चक्रम’ म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. खरं तर त्या शाळेच्या अध्यापकांना धन्यवादच द्यायला हवेत.

एडिसन खरंच त्या शाळेत ‘शिकला’ असता तर ‘वाया’ गेला असता! गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनाही शाळेचा मन:पूर्वक तिटकारा होता. बाराव्या वर्षांनंतर ते शाळेत गेलेच नाहीत. त्याचं खरं शिक्षण झालं ते निसर्गाच्या सान्निध्यात आणि साहित्यकलांच्या सहवासात. त्यातूनच ते नोबेल पारितोषिक विजेते महाकवी झाले. आपल्या अनुभवाच्या आधारेच त्यांनी ‘शांतीनिकेतन’ या शिक्षणातील अभिनव प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली. ‘फोर्ड’ गाड्यांचा विश्‍वविख्यात हेन्‍री फोर्डची गाडी मॅट्रिकवरच अडली होती. त्यावरून त्याला ‘निर्बुद्ध’ म्हणून हिणवण्याच्या ‘सुशिक्षित’ मंडळींवर त्यानं चक्क खटला भरला होता आणि जिंकलाही. ‘मी धड मॅट्रिक्‍युलेट नसलो, तरी पीएच.डी. केलेले संशोधक माझ्याकडं नोकरी करतात,’ हे त्यानं कोर्टात ठणकावून सांगितलं होतं. अर्थात हे सारं असलं तरीही हे मान्य करूया की तुमच्या मुलासाठी शालेय शिक्षण महत्त्वाचं आहे. आज जे अपरिहार्यही दिसत आहे. प्रश्‍न हा आहे की, तेवढं पुरेसं आहे का? जेवढ्यावर तो आयुष्यातही यश मिळवू शकेल, असं गृहीत धरता येईल का?

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article By Shivaraj Gorle In Edu Supplement Of Sakal Pune Today