शब्द बाळाला मोठे करतात (शिवराज गोर्ले)

शब्द बाळाला मोठे करतात (शिवराज गोर्ले)

बालक-पालक
शब्द शिकता शिकता बाळ कसं मोठं होत असतं, सुसंस्कृत होत असतं, माणूस म्हणून घडत असतं याचं स्तिमित करणारं विवेचन डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी ‘घरोघरी ज्ञानेश्‍वर जन्मती’मध्ये केलं आहे. ते सारांशानं असं आहे... ‘जन्मतःच बाळ स्वतःच्या विश्‍वाचं सम्राट असतं. आत्मकेंद्री आणि सुखवादी असतं. ते ऐटीत रडूनच आज्ञा सोडत असतं. मला दूध हवंय, मला उचलून कडेवर घ्या! त्याला शब्दोच्चार करता येऊ लागतात. तो उच्चारतो त्या व्यक्ती किंवा वस्तू त्याच्यासमोर हजर होतात. ते समजतं ही माझीच किमया आहे. 

दुसऱ्या वर्षाच्या मध्याच्या आसपास ही किमया हळूहळू लोप पावते. आधी ते मानत असतं जग आपल्याकरिता आहे, आपण जगाचा आणि जग आपला एक अविभाज्य भाग आहे. हळूहळू त्याच्या मनाला समजू लागतं समोर दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू वेगळ्या आहेत, स्वतंत्र आहेत. त्या आपल्या नव्हे, त्यांच्या त्यांच्या मर्जीनं हालत चालत असतात. बाळाला (निसर्गातच येणारी) ही समज प्रगतीची फार मोठी झेप असते. अर्थात तरीही जन्मतः जडलेली ‘मला इच्छा झाली की तिची पूर्तताही होणारच,’ ही कल्पना टिकून असते. 

बालपणीच बाळाच्या या स्वप्नाळूपणाला व स्वकेंद्री वृत्तीला मुरड घालावी लागते. ती घातली तरच प्राथमिक अवस्थेतून तो जीव प्रगत अवस्थेपर्यंत पोचू शकतो. जग त्याच्या मर्जीवर चालणारं नाही, हे त्याला समजावं लागतं. स्वतःच्या शारीरिक गरजा आणि त्यांचं समाधान यात गुरफटलेल्या त्या जिवाला बाहेर काढण्याशिवाय त्याच्या ‘मना’ची वाढ कशी होणार?’ 

हे साधण्यासाठी कामी येतात शब्द! 
‘आई’ या उच्चारानं नातं व शब्द यांची बालमनात सांगड घातली जाणं ही बाळाच्या व्यक्तिमत्त्व निर्मितीच्या दिशेनं फार मोठी प्रगती असते. ते त्या शब्दोच्चारानं आईची मानसिक प्रतिकृती निर्माण करू शकतं. मग अनेकदा प्रत्यक्ष आईच हवी असते, तिथं आई हा शब्द पुरेसा वाटू लागतो. (मोठेपणीही संकटकाळी ‘आई’ हा शब्द कामी येत असतो.) भाषा, शब्द हे माणसाला प्राप्त परिस्थितीवर किंवा नैसर्गिक प्रेरणांवर विजय मिळवण्याच्या कामी अतिशय मोलाचं साह्य करतात. 

‘फूल तोडायचं नसतं हे छान असतं,’ हे पुनःपुन्हा ऐकून मूल प्रत्यक्ष फुलाऐवजी छान छान शब्दात रमतं. प्रत्यक्ष वस्तूऐवजी त्या वस्तूचं शब्द प्रतीक त्याला पुरेसं होतं. म्हणूनच डॉ. सरदेसाई म्हणतात, ‘सुसंस्कार तो हाच. बुद्धिसंवर्धनाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. भाषेचे ते एक महत्त्वाचे कार्य आहे.’

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com