मुलं कल्पक होतील कशी?

 शिवराज गोर्ले
Monday, 1 July 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक 
चुटकीसरशी असंख्य गोष्टी करू शकणारा ‘मोबाईल’ प्रत्येकाच्याच हाती आला आहे. छोटी छोटी मुलंही ‘टेक्‍नोसॅव्ही’ होत आधुनिक तंत्रज्ञान झपाट्यानं आत्मसात करत आहेत. सगळीच मुलं. मग प्रश्‍न येतो तुमचा मुलगा इतरांपेक्षा वेगळा कसा ठरू शकतो. नवं, वेगळं, विशेष, उपयुक्त, मजेशीर, अधिक सुंदर, कलात्मक असं काय करू शकतो? तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीसुद्धा क्रिएटिव्हिटी लागते. कल्पकता आवश्‍यक असते. 

तुमचा मुलगा कल्पक कसा होऊ शकेल?
शास्त्र असं सांगतं, की माणसाचा डावा मेंदू हा तर्कसंगत विचार करणारा असतो. तर उजवा मेंदू हा कल्पक, सर्जनशील असतो. डावा मेंदू ‘सरळमार्गी’ म्हणजे ‘लिनिअर थिंकिंग’ करणारा असतो. तर उजवा मेंदू ‘ॲबस्ट्रॅक्‍ट व कन्सेच्युअल थिंकिंग’ करत असतो. संकल्पनात्मक विचार करू शकतो. आजच्या शालेय शिक्षणात मुख्यतः स्मरणशक्तीवर भर दिला जातो. त्यामुळे फक्त डाव्या मेंदूचा वापर केला जातो. कल्पकता, सजकता या गोष्टींचा वापर होत नसल्यानं उजव्या मेंदूच्या विकासाला आजच्या शिक्षण पद्धतीत फारसा वाव नसतो. अर्थात आता बदलत्या काळानुसार शालेय शिक्षणातही बदलांचे प्रयत्न सुरू आहेत. शालेय शिक्षणामध्ये ‘पाठांतर’ऐवजी तंत्रज्ञानाच्या वापराला, समस्या सोडविण्याच्या जीवनावश्‍यक कौशल्यांना, चिकित्सक वृत्तीला, सर्जनशीलतेला आणि आत्मविश्‍वास वाढविण्यावर भर दिला जाणं अपेक्षित आहे. 

अर्थात यातही पालकांची जबाबदारी, त्यांचा सहभाग हा हवाच. त्यासाठी पालकांनी मुलांची जिज्ञासा जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना विमानतळ, पोर्टट्रस्ट अशा ठिकाणी सहलींना नेलं पाहिजे. हे असं का? हे असंच का? तसं का नाही? हे तसं केलं तर काय होईल? असे प्रश्‍न विचारण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल, यासाठी अनेक छोट्या छोट्या खुब्या वापरता येतात. कोडी, उखाणे, गोष्ट अर्धी सांगून ती पुरी करायला सांगणे, ‘मी पक्षी झालो तर’ असे कल्पनाविलासाला वाव देणारे निबंध लिहिण्यास सांगणं, मेकॅनोजसारखे खेळ खेळू देणं, चित्रं हवी तशी (काही वेळा मुद्दाम उलटी ठेवून रंगवू देणं, मातीशी खेळू देणं, मातीच्या हव्या तशा आकाराच्या गोष्टी करून देणं, कल्पनाशक्तीला वाव देणारी विविध खेळणी उपलब्ध करून देणं, मुलांना एकदा नवं, वेगळं काही स्वतः करण्याची गोडी लागली, की ती थांबणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle