शिक्षा - उद्देश आणि परिणाम

शिक्षा - उद्देश आणि परिणाम

बालक-पालक
शिक्षा म्हणजे काय? तर अयोग्य, चुकीच्या, वाईट, हानिकारक, समाजविघातक वर्तनाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून तशी कृती अगर वर्तन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करणं, त्या व्यक्तीला गंभीर परिणाम भोगायला लावला, म्हणजे  शिक्षा होय.

मानसशास्त्रात शिक्षेच्या संदर्भात अशीही एक व्याख्या आहे, की विशिष्ट प्रकारच्या वर्तनाला अगर कृतीला सजा म्हणून परावृत्त उद्दीपकांचा वापर केला जातो... परावृत्त उद्दीपक म्हणजे शिक्षा. मुलांच्या संदर्भात असं म्हटलं आहे, की चांगल्या प्रकारे अध्ययन व्हावं, हा शिक्षेमागील  हेतू आहे.

समाजात शिक्षा असाव्यात की नसाव्यात, हा वेगळा मुद्दा आहे. शाळेत शिक्षा असाव्यात का, हा प्रश्‍न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. स्पेन्सरसारखा एखादा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘वर्तनाचा अपरिहार्य परिणाम म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षा भोगलीच पाहिजे.’’

मात्र, अनेक मानसतज्ज्ञांनी, शिक्षणतज्ज्ञांनी या मताचं खंडन केलं आहे. त्याहीपेक्षा आता मेंदूवरील संशोधनानं हे दाखवून दिलं आहे, की शिक्षेचा अतिशय वाईट परिणाम मुलांच्या मेंदूवर होत असतो. तरीही, योग्य वळण लावून मुलांना शिस्तीच्या साच्यात घालण्यासाठी शाळेत दिवसभर छोट्या-मोठ्या, सौम्य-कडक शिक्षा किंवा धमक्‍या सुरूच असतात. शाळेत उशिरा येण्याबद्दल शिक्षा, गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षा, वर्गात इतर मुलांशी बोलताना दिसला म्हणून धमक्‍या... अभ्यास देतानाच त्याबद्दल उत्सुकता किंवा उत्साह निर्माण न करता फक्त तो अभ्यास केला नाही, तर काय काय शिक्षा फर्मावल्या जातील याचा पाढा वाचणं... अशा वातावरणामुळं मुलांचा अहं दुखावला जात नाही का? मुलं अशा स्वरूपाचा अपमान रोजच, सतत सहन करत असतात. मुलांचा अपमान करणं, त्यांना नाउमेद करणं हीसुद्धा त्यांच्यासाठी कठोर शिक्षा असते. मारणं, वर्गाबाहेर काढणं या शिक्षांना शिक्षा म्हणून रीतसर मान्यता तरी आहे; पण मुलांच्या मनाला लागेल असं बोलणं, त्यांना वेगवेगळ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबवणं, त्यांच्या संवेदना लक्षात न घेता बोलणं या सगळ्याच कृतींना शिक्षा मानलं पाहिजे. याही शिक्षाच असतात हे शिक्षकांना उमजलं, तर त्यांच्या परिणामांचा विचार तरी  शिक्षकांच्या मनात येईल!

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे" मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com