"धमकी' देणं टाळा!

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक

कित्येकदा असं होतं, की पालक जे करू नका म्हणून सांगतात, ते मुलं हटकून करतात. अगदी खरमरीत शब्दांत तंबी, ताकीद, धमकी देऊनही मुलं ऐकत नाहीत. असं का होतं? मुलांनी बाहेर खेळताना आरडाओरडा करू नये, असं कुणीही पालक म्हणत नाहीत. मुलं भरपूर ओरडत, दंगा करतात, पण त्यांनी घरात तरी शांत राहावं, निदान आरडाओरडा, आदळआपट करू नये, मोडतोड करू नये, ही पालकांची अगदी वाजवी अपेक्षा असते, पण मुलांच्या ज्या बालसुलभ प्रवृत्ती असतात, त्या असतातच.

हाती काही लागलं, की ते फिरवून, आपटून बघणं हे तर छोट्या मुलांचं "शिकणं'च असतं. मोठ्या मुलांच्या बाबतीत ती अनावर ऊर्मी असते. अचानक अमेयच्या हाती एक छोटा दंडुका येतो. काही वेळातच तो दंडुका तो घरातल्या टीपॉयवर आपटून पाहतो... आई तत्काळ बजावते, "पुन्हा आपटच तू... मग मी बघते.'' पण मौज म्हणजे, अमेय पुन्हा टीपॉयवरच दंडुका आपटतो. असं का होतं? अमेय आईचं ऐकत का नाही? याचं फारच मजेशीर स्पष्टीकरण डॉ. गिनोट यांनी दिलं आहे. पोरगं आईचं "ऐकत' नाही असं नाही... फक्त गंमत अशी, की आईच्या बोलण्यातलं नेमकं "नको' तेवढंच ऐकतं! "पुन्हा आपटच तू, मग मी बघते,' या तंबीतले त्यानं "ऐकलेले' शब्द "पुन्हा आपटच तू' एवढेच असतात. "मग मी बघते..' हे शब्द ऐकूनही अमेय मनावर घेत नाही. कारण आईच्या बहुतेक धमक्‍या (तंब्या) "पोकळ' असतात, हे त्यानं जोखलेलं असतं. आहे की नाही गंमत? पण आई बिचारी पेचात पडते. करावं काय? रट्टा घालावा? खडसावून बोलावं? खरा उपाय म्हणजे प्रारंभीच तंबी न देता, "तुला काय आपटून पाहायचंय ना, ते इथं आपट,' अशी त्याला मुभा द्यावी.

होय, असं वागता येतं. डॉ. अनिल अवचट यांच्या मुलीनं त्यांचा चष्मा आपटून फोडला तरी ते तिला ओरडले नाहीत. त्यांनी दुसरा चष्मा करून घेतला, पण नंतर मुलीनं त्याला हात लावला नाही. अवचटांनी मुलींना जुन्या फ्रेम्‌स खास "आपटून पाहण्यासाठी' दिल्या! मुलांना ओरडल्याशिवाय अक्कल येत नाही, हे खरं नाही.

Web Title: Article by shivraj gorle in EDU supplement of Sakal Pune Today

टॅग्स