​अटी घालण्यात "मौज' नसते!

guardian
guardian

बालक-पालक

पालक होणं सोपं नसतं, खरं आहे, पण ते वाटतं तितकं अवघडही नसतं. म्हणजे ती काही अगदी तारेवरची कसरत वगैरे नसते. फक्त एवढंच, थोडा संयम आणि थोडं चतूर असावं लागतं. "सॉंप भी मरे और लाठी भी न टूटे,' या धर्तीची चतुराई. अर्थात संयमही हवाच. ओरडण्याचा, धमकावण्याचा मोह पालकांनी आवरला, तर मुलं त्यांची तीच शहाणी (तीही लवकर) होण्याची दाट शक्‍यता असते. मुलांवर काही बंधनं घालावी लागतात. त्याचप्रमाणं काही गोष्टींसाठी त्यांना मुभाही द्यावी लागते. काही पालकांना सतत "सशर्त मुभा' देण्याची सवय असते. त्यांचा अटी घालण्यावर भर असतो. या अटी म्हणजे खरं तर अपेक्षा असतात. आणि त्या अयोग्य, अवाजवी असतात, असं नाही. पण होतं काय, त्या "अट' स्वरूपात व्यक्त झाल्यावर मुलांना जाचक वाटतात.

एक अगदी सोपं उदाहरण घेऊ. मुलांचा पसारा ही तर "घर घरकी कहानी' आहे. मुलं म्हटलं, की पसारा करणार हे तर सरळ आहे. प्रश्‍न आहे मुलांच्या पसारा करण्याकडं पाहण्याच्या पालकीय दृष्टिकोनाचा. काही आयांचा पवित्रा असतो, "हं... तुम्ही नुसता पसारा करीत राहा... आई आहे ना आवरायला?' जणू काही आईला आवरायला लागावं यासाठीच मुलं पसारा करत असतात. "बाबां'चा जरा वेगळाच खाक्‍या असतो. मुलं असली, की पसारा होणार हे ते नाकारीत नाहीत. फक्त बायकांसाठी त्यांचा सवाल असतो, "मुलं पसारा करणारच, तुला आवरता येत नाही का?' काही पालक थोडे अधिक समंजस असतात, ते मुलांना म्हणतात, "हवा तेवढा पसारा करा, पण तुमचा तुम्ही आवरायचा.' मुलं "हो हो' म्हणतात खरी, पण प्रत्यक्ष आवरण्याची वेळ येते, तेव्हा गडबड होते.

कुठल्याही गोष्टीसाठी मुलांना अशी सशर्त मुभा दिली जाते, तेव्हा त्या सवलतीतली गंमतच निघून जाते. यावर उपाय? मुलांना "खेळू' द्या... पसारा करू द्यावा. फक्त तिकडं लक्ष ठेवावं... मग योग्य वेळी "चला पुरे आता... आपण आवरू या,' म्हणत मुलाला आवरायला मदत करावी. फारच "आदर्श' वाटतं का हे? असेलही. काही पालक असं करतात खरं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com