"असं रागवायचं असतं होय?'

child
child

बालक-पालक

काही वेळा राग येणं स्वाभाविक असतं, पण तो येतो तो काहीसा अचानक अनपेक्षितपणे. तसा तो क्षणिकही असू शकतो, तरी त्या क्षणी त्याचा आपल्यावर पूर्ण ताबा असतो. रागाच्या भरात अगदी आपल्या लाडक्‍या मुलांनाही आपण बोलू नये, तो बोलू शकतो; प्रसंगी हातही उगारू शकतो. म्हणूनच राग हाताळणं व तो योग्य शब्दांत व्यक्त करणं, हे महत्त्वाचं ठरतं. रागाची योग्य अशी अभिव्यक्ती खूप काही साधू शकते आणि सरावानं ती जमू शकते.

समजा मुलं टीव्ही बघण्यात गुंतली आहेत. आईनं ताटं वाढली आहेत, पण मुलांना त्याची शुद्ध नाही. अशा वेळी आईला राग किंवा त्रागा व्यक्त करण्यासाठी हा एक सहज पर्याय असतो, "तुम्हाला जेवायचं नसेल तर नका जेवू, बसा खुशाल टीव्ही बघत.' दुसरा पर्याय स्वतःच जाऊन टीव्ही बंद करणं. या पर्यायात नाराजीनं का होईना, मुलांना उठणं भाग पडतं. पण आईचा राग अव्यक्तच राहतो! तो आईनं असा (काहीसा सविस्तर) व्यक्त केला तर, "तुम्हाला मी तिसऱ्यांदा बोलावतेय, पण तुम्ही असे बसलाय, जणू काही तुम्हाला ऐकायलाच आलेलं नाही. मी काय भिंतीशी बोलतेय का? अरे माझी सोडा, त्या अन्नाची तरी काही किंमत कराल की नाही?'

इथं कुणी थेट दुखावलं जात नाही, तरीही तुम्ही किती दुखावला गेलात ते व्यवस्थित "पोचतं' आणि तेवढंच तर तुम्हाला अपेक्षित असतं. आपला राग असा संयमित, तरीही प्रभावीपणे व्यक्त करण्याचं कौशल्य पालक आत्मसात करू शकले, तर त्याचा आणखीही मोठा फायदा असतो... मुलांसाठी. राग आला तर तो कसा व्यक्त करावा, याचं एक प्रात्यक्षिकच मुलांना मिळतं. मुलांना हेही समजायला हवं की राग, द्वेष अशा नकारात्मक भावना मनात येत असतात, त्या व्यक्तही करायच्या असतात. पण आपला राग हा दुसऱ्यांना मान्य होईल. अशा पद्धतीनंही व्यक्त करता येतो. पालकांच्या वागण्यातून मुलांना त्यासाठीचं प्रात्यक्षिक मिळायला हवं. कुणाला तरी चांगलं दुखावल्याशिवाय राग व्यक्तच होत नाही, ही चुकीची कल्पना दूर व्हायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com