स्वातंत्र्याशिवाय मूल शिकूच शकत नाही!

child
child

बालक-पालक 

स्वातंत्र्य ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक गरज असते. लहान मुलंही याला अपवाद नाहीत. आपण मुलांवर प्रेम करतो. त्यांच्यासाठी कष्ट करतो, पण त्यांना स्वातंत्र्य देत नाही. "मुलांचं भलं कशात आहे हे मोठ्यांना कळतं, सबब मुलांनी मोठ्याचं ऐकलं पाहिजे,' हा आपला दृष्टिकोन असतो. हा पूर्णतः चुकीचा, अशास्त्रीय दृष्टिकोन आहे. 

स्वातंत्र्य हाच शिक्षणाचा पाया असतो. जो स्वतंत्र असतो, तोच विचार करू शकतो... तोच चांगलं शिकू शकतो. मुलं स्वयंप्रेरणेनंच वाढत असतात, शिकत असतात. आपण दिलं नाही, तरी मुलं नैसर्गिकपणे स्वातंत्र्य घेतच असतात. म्हणूनच त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून, आपण फक्त जरूर तेव्हा मदत करायची असते. आठ वर्षांपर्यंतचं वय हे मेंदू "तयार' होत जाण्याचं वय असतं. या वयात धडपडण्याचं, वाढण्याचं स्वातंत्र्य मुलांना मिळायलाच हवं. मुलांना त्यांच्या "कला'नं ंशिकता येणं म्हणजे स्वातंत्र्य. मुलांना त्यांच्या वेगानं शिकता येणं म्हणजे स्वातंत्र्य. त्यांना एखादी गोष्ट शिकण्यासाठी आवश्‍यक तो वेळ उपलब्ध असणं म्हणजे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याशिवाय मूल शिकूच शकत नाही. स्वातंत्र्य नसेल, दडपण असेल तर "शिकणं' होतच नाही. कुठल्याही सक्तीनं जबरदस्तीनं खराखुरा विकास होऊच शकत नाही. मोठं झाल्यावर त्यांना जे निर्णय घ्यायचे आहेत, त्याची "तयारी' बालवयापासूनच व्हायला हवी.

मुलांवर विश्‍वास ठेवून त्यांना स्वातंत्र्य देणं आवश्‍यक असतं. मुलांना आवश्‍यक, खरंतर अत्यावश्‍यक असलेली "स्वातंत्र्य' अशी : 
हालचालीचं स्वातंत्र्य : यातूनच मेंदूतील पेशींची परस्पर जुळणी होते. 
बोलण्याचं स्वातंत्र्य : यातूनच मेंदूतील भाषिक केंद्रं तयार होतात. 
व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य : संवाद, विचार, भावना, कल्पना व्यक्त करता येतात. 
प्रश्‍न विचारण्याचं स्वातंत्र्य : यातूनच त्यांचं कुतूहल शमतं, ज्ञान मिळतं. 
विचार करण्याचं स्वातंत्र्य : यातूनच विचारक्षमता घडते. 
अनुभवाचं स्वातंत्र्य : विकासासाठी स्वतःच्या कलानं अनुभव घेता येतात. 
निवड करण्याचं स्वातंत्र्य : यातूनच निर्णयक्षमता येते. 
स्वतः प्रयत्न करून पाहण्याचं स्वातंत्र्य : कृतीतूनच शिक्षण घडतं. 
स्वयंस्फूर्तीनं वागण्याचं स्वातंत्र्य : यातूनच आत्मविश्‍वास, जबाबदारी येते. 
विश्रांतीचं स्वातंत्र्य : शिकलेलं सारं स्मृतीत साठविण्यासाठी हे आवश्‍यक असतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com