मुलांनो बिनधास्त प्रश्न विचारा!

child
child

बालक-पालक 

मूल बोलायला लागलं की, किती आनंद होतो आपल्याला. त्याच्या प्रत्येक अगदी बोबड्या बोलाचंही कौतुक वाटत असतं. पण बोलता यायला लागलं की ते प्रश्‍न विचारू लागतं. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्‍न आवर असं म्हणावंसं वाटतं. "हे काय आहे?' हा प्रश्‍न मुलाला सारखाच पडत असतो, कारण असंख्य नव्या वस्तू त्याला दिसत असतात. त्या वस्तूंची, अवतीभवतीच्या जगाची ते माहिती करून घेत असतं. हे खरंय की एकच प्रश्‍न ते पुनःपुन्हा विचारतं... तो त्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असतो, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. 

मुलं सतत प्रश्‍न विचारून भंडावतात ती पालकांना त्रास देण्यासाठी नव्हे, ते त्याचं "शिकणं' असतं. तेव्हा मुलांनी शिकावं असं वाटत असल्यास पालकांनी त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरं देणं, तीही न कंटाळता अपरिहार्य ठरतं. शिकण्यात प्रश्‍नांचं महत्त्व अफाट असतं. "सफरचंद खाली का पडतं?' या जगप्रसिद्ध प्रश्‍नाचं उत्तर शोधतानाच न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता. तुमचं मूलही तसं करू शकतं. त्यामुळे त्याच्या एखाद्या अवघड प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला देता आलं नाही, तरी हरकत नाही. असा प्रश्‍न विचारल्याबद्दल तुम्ही त्याचं कौतुक करू शकता. त्यालाच विचार करायला, उत्तर शोधायला उद्युक्त करू शकता. त्याच्यासोबत तुम्हीही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकता. मात्र ज्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता, ती आवर्जून द्या.

आपल्या प्रश्‍नांची उत्तरं पालकांकडं मिळतात, हा विश्‍वास वाटल्यास मुलं पुढंही सर्व बाबतीत मनमोकळेपणानं बोलत राहतील. तुमच्याकडं त्यांच्या प्रश्‍नांना वेळ नाही, असं त्यांना वाटल्यास त्यांचे प्रश्‍न, मनातलं कुतूहल विरत जाईल. प्रश्‍न पडायचेच बंद होतील. म्हणूनच "सारखे कसले रे प्रश्‍न विचारत असतोस,' ही प्रतिक्रिया टाळा. "कसले रे मूर्खासारखे प्रश्‍न विचारतोस हे' म्हणण्याचं मोह तर कटाक्षाने टाळा. बालसुलभ कुतूहलाचा कोवळ्या वयातच गळा घोटणं हे अक्षम्यच आहे. शिकण्याची प्रक्रियाच थांबवणारं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com