काही बाबतीत हुशार, काही बाबतीत ‘ढ’

शिवराज गोर्ले
बुधवार, 20 मार्च 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
नोबेल पारितोषिक मिळवणारे अल्बर्ट आइन्स्टाईन हे शाळेमध्ये ‘ढ’ म्हणून प्रसिद्ध होते. ज्याच्या नावावर जगात सर्वाधिक पेटंट्‌स आहेत, ते थॉमस एडिसन चौथी नापास होते. फार कशाला विजेचा शोध लावणारा फॅरडेही सेम म्हणजे चौथी नापास होता. आपले रामानुजन, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणिती, दोन वेळा ‘मॅट्रिक’ला बसले होते. दुसऱ्या प्रयत्नात ते पास झाले होते.

विख्यात उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांना एका संस्थेनं त्यांच्या बोर्डात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं होतं. शंतनुरावांनी म्हटलं, ‘अहो, मी या सत्कारासाठी योग्य माणूस नव्हे. मी स्वतः बोर्डाच्या परीक्षेत ‘संस्कृत’मध्ये नापास झालो होतो.
कोण हुशार, कोण ‘ढ’ हे कुणी ठरवायचं आणि कशावरून? दहावी, बारावीच्या टक्केवारीवरून? अशी असंख्य उदाहरणं आहेत, की शाळेत ‘ढ’ म्हणून उपेक्षिली गेलेली मुलं, त्यांना त्यांची योग्य ती दिशा मिळाल्यावर नावारूपाला आली आहेत. शाळेतल्या विषयांखेरीज कितीतरी विषय या जगात आहेत. १८ विद्या, ६४ कला आहेत. गार्डनर म्हणतात, ‘आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.’ गिलफोर्ड म्हणतात, ‘बुद्धीचे तब्बल १८० पैलू असतात. प्रत्येकाकडे काही पैलू असतातच आणि काही नसतातच!’

थोडक्‍यात, प्रत्येक जण काही बाबतींत हुशार असतो, काहींत थोडासाच हुशार असतो. काहींत फारच हुशार असतो, काही गोष्टी मात्र त्याला थोड्याशाच येतात, तर काहींत तो अगदीच ‘ढ’ असतो. मुळातच प्रत्येकाचा शिकण्याचा वेग वेगळा असतो. त्याचबरोबर हेही खरं, की प्रत्येकाला काही गोष्टी पटकन समजतात, तर काही गोष्टी समजायला वेळ लागतो. म्हणूनच असं म्हटलं जातं, प्रत्येकाला त्याच्या गतीनं शिकायला मिळालं, तर प्रत्येक जण खूप काही शिकू शकतो.

प्रत्येकानं आपल्याला काय येतं... काय आवडतं हे ओळखावं लागतं. आपली नि आपल्या योग्यतेच्या क्षेत्राची एकदा सांगड बसली, की प्रयत्नानं, जिद्दीनं ध्येय साध्य करता येतं. आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर त्यासाठी अनेक वाटा नि उपवाटा आहेत. त्यातली एखादी वाट आपली वाट बघत थांबलेले आहे. पालक आणि शिक्षक यांनी, हे मुलांना समजून सांगायला हवं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today