मुलं हुशार होतील कशी?

Education
Education

बालक-पालक
आपली मुलं हुशार असावीत, असं कुठल्या पालकांना वाटणार नाही? पण सगळ्यांची मुलं हुशार कशी असतील? मुळातच मुलं हुशार निपजली नाहीत, तर पालकांनी आटापिटा करून काय फरक पडणार? आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? तर यातलं इंगित असं आहे, की ‘आडा’त असतंच, हे कुणाचं मत नव्हे, हे शास्त्र आहे. शरीरशास्त्र असं सांगतं, की जन्मतः सर्व मुलं हुशार असतातच. शहाणी आणि बुद्धिमान असतात, एखादा अपवाद वगळता.

आपण हे प्रारंभीच पाहिलं आहे, की प्रत्येक मूल बुद्धिमान असतंच. आपला तो ‘बाब्या’ असं प्रत्येक आईला वाटतं. त्यात खूपसं तथ्य असतं. (दुसऱ्याचं ते ‘कार्ट’ हे मात्र खरं नसतं!) प्रत्येक (आईचा) ‘बाब्या’ शहाणा आणि हुशार असतो, हे अनेक वैज्ञानिक प्रयोगांनी सिद्ध झालं आहे. मात्र, मुलांच्या उपजत हुशारीला वैज्ञानिक पुरावा कशाला हवा? तो तर आपल्यालाही स्पष्ट दिसत असतो.

प्रत्येक मूल रांगू लागतं, उठून चालू लागतं, बोलू लागतं, तेव्हा घरदार, कौतुकानं आनंदून का जात असतं? हे कौतुक त्या बाळाच्या हुशारीचं, आकलनाचं आणि प्रगतीचंच तर असतं. प्रत्येक मूल रांगत्या वयापासून अगदी पावलोपावली आपल्या हुशारीचा पुरावा देत असतं. म्हणजे बुद्धिमत्तेचं बीज हे प्रत्येक मुलात असतं. मात्र, मोठी मंडळी त्या बालकातलं हे बीज उमलू देत नाहीत. त्याला योग्य ते खतपाणी घालत नाहीत. काही वेळा तर दुर्लक्ष करून ते बीज नाहीसं करून टाकतात किंवा मग अवास्तव अपेक्षांच्या दडपणानं ते ‘बीज’ गुदमरून टाकतात. ही मोठी मंडळी म्हणजे पालक, शिक्षक, शेजारीपाजारी, नातेवाईक... यात पहिला नंबर अर्थातच पालकांचा.

तात्पर्य; मुलं हुशार झाली नाहीत, तर त्याची काही अंशी तरी जबाबदारी पालकांवर येते. तथापि याचाच अर्थ असा, की पालकांनी ही जबाबदारी स्वीकारल्यास निश्‍चित फरक पडू शकतो. मुलं हुशार व्हावीत, असा प्रयत्न पालक करू शकतात. त्या प्रयत्नांची दिशा मात्र जाणून घ्यायला हवी, हेही आपण प्रारंभीच पाहिलं आहे, की बुद्धिमत्ता वाढवता येते. मात्र त्यासाठी हुशारी, बुद्धिमत्ता म्हणजे काय? तिचे विविध पैलू कोणते, हे समजून घ्यायला हवं. ते समजून घेतल्या ‘बुद्धी’विषयीच्या आपल्या ठोकळेबाज कल्पना दूर होऊ शकतील... प्रथम त्या दूर होणं  आवश्‍यकच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com