मूल रेसचा घोडा नव्हे! 

शिवराज गोर्ले
सोमवार, 8 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक 

सगळेच पालक मुलांचं भलं चिंतत असतात. मुलांना हवं ते देता यावं म्हणून कष्टही करत असतात. आया मुलांच्या परीक्षेच्या वेळी रजा घेत असतात. साहजिकच मुलांकडून त्यांच्या काही अपेक्षा असतात. "काही अपेक्षा' नव्हे, एकच अपेक्षा असते. "पहिलं यावं. ए ग्रेड मिळावी!' ही अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण ती आपल्या मुलांच्या संदर्भात अवास्तव नाही ना, मुलावर आपण अतिरिक्त दडपण तर आणत नाहीना याचाही विचार हवा. "मूल का रेसचा घोडा' या लेखात मीना शिलेदार, हे वास्तव अधोरेखित करताना म्हणतात, ""मुलांनी शाळेत, छंदवर्गात, स्पर्धेत कायम पहिल्या स्थानावरच असलं पाहिजे, असा अट्टहास बऱ्याच पालकांच्या बोलण्यातून, वागण्यातून मुलांना सतत जाणवत असतो. मुलांनी सांगून ऐकलं नाही, तर त्यांना रागावून, धपाटा घालून, काही लालूच दाखवून, प्रसंगी उपहासात्मक बोलून, दुसऱ्यांशी तुलना करून सतत दबावाखाली ठेवलं जातं. पालकांच्या अवास्तव अपेक्षांची साधारण ही अशी कारणं असतात. 

"आम्ही कायम वरच्या स्थानावर होतो, म्हणून तुम्हीही असलं पाहिजे.' 
"आम्हाला नाही जमलं वरच्या स्थानावर जायला, म्हणून तर इतकं धडपडतोय... तुम्ही तरी वर असलंच पाहिजे.' "इतरांची मुलं कशी वर जातात. तुम्ही का नाही जाऊ शकत?' या ना त्या कारणानं पालकांच्या मागण्या वाढतच जातात, परिणाम मात्र मुलांना भोगावे लागतात. पालक तरीही "आम्ही शेवटी त्यांच्या भल्यासाठीच करतोय ना,' या पवित्र्यात असतात. होय, मुलांकडून, अपेक्षा ठेवण्यास काहीच हरकत नाही, त्यातून मुलांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोचण्यास मदत होऊ शकते, पण अवास्तव, तुलनात्मक अपेक्षांचं ओझं अकारण लादून आपल्या मुलांना "रेसचा घोडा' बनवायचं नाही, याचंही भान पालकांनी ठेवायला हवं. 

मुलांच्या मानसिक वाढीवर याचा परिणाम होते आणि वर्तनात्मक समस्या उद्‌भवतात. रागावून किंवा धपाटे घालून मुलं कोडगी बनतात. लालूच दाखवत राहिलं तर मुलंच पुढे सांगतात, "सायकल घेऊन देणार असलात तर अभ्यास करीन.' 

उपहासात्मक बोलण्यानं उलट बोलायला, खोटं बोलायला, कॉपी करायला प्रवृत्त होऊ शकतात. दुसऱ्या मुलांशी तुलना करत राहिलं तर मुलं इतरांचा द्वेष करायला शिकता किंवा स्वतःविषयी न्यूनगंड बाळगू लागतात. यातलं तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे. 

Web Title: Article Shivraj Gorle in EDU supplement of Sakal Pune Today