अभ्यास कसा घ्यावा?

शिवराज गोर्ले
गुरुवार, 11 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, हा एक पालकांसाठी मोठा प्रश्‍न असतो. खरं म्हणजे मुलांचा अभ्यास पालकांनी घेऊच नये, असं बहुतेक तज्ज्ञ सुचवतात. मुलांचा अभ्यास त्यांचा त्यांनाच करू द्यावा. फक्त तिकडे पालकांचं लक्ष असावं. ती अभ्यास योग्य पद्धतीनं करताहेत ना हे पाहावं... त्यांना अडचण असल्यास उपलब्ध असावं. मुलं एखाद्या विषयाचा अभ्यास करत नसतील, तर तो विषय आपण त्यांना आवडेल असा समजून देऊ शकू का, असा किती पालक विचार करतात? समजून देऊन किंवा घेऊन केलेल्या अभ्यासाची गोडी वाटते व तो लक्षातही राहतो. मुलांच्या गरजा लक्षात घेणारे, त्यांच्या अडचणी समजावून घेणारे, त्यांच्याशी संवाद साधणारे पालक असल्यास मुलांचा अभ्यास चांगला होतो. तेच सतत अभ्यासाचा लकडा लावणारे, मुलांच्या प्रयत्नांची कदर न करणारे, सतत चुका दाखविणारे पालक असल्यास मुलांचा अभ्यास गडबडतो. मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत पालकांची भूमिका ‘महत्त्वाची’ असली तरी ती पडद्यामागची असते, हे पालक विसरतात. शिवाय चांगल्या अभ्यासासाठी त्यांचा सगळा रोख मुलांवर असतो. घरातलं वातावरण शांत आणि चांगलं ठेवलं, वादविवाद, आरडाओरडा, टीव्हीचे घणाघाती आवाज हे सारं टाळता आल्यास तीही मुलांच्या अभ्यासाला मदतच ठरते. या संदर्भात डॉ. नियती चितालिया सुचवतात, की मुलांना अभ्यासाचा कंटाळा आल्यास त्यांना समजून घ्यावं.

शाळेतून दिलेला अभ्यास करायलाच हवा, असं ओरडून सांगू नये. (त्यांना ते माहिती असतंच), त्याऐवजी ‘अरे, अभ्यास करावा तर लागणारच आहे... तू सांग कसा करायचा?’ एवढ्यानं सुद्धा मुलं सुखावतात. अभ्यासाचा त्रास जरा कमी होतो. मुलं कधी कधी खरोखरच खूप काही चांगलं सुचवू शकतात.

त्यांना तशी संधी (तर) द्यावी. मुलांकडून अभ्यास करून घेणं ही एक कला आहे. म्हणूनच शक्‍य तितकं मुलांच्या कलानं घ्यावं. मुलांचा मूड असताना त्यांचा अभ्यास चांगला होतो. त्यांना ‘मुडात’ कसं आणता येईल हे पालकांना समजू शकतं, पण पालकांना मुलांच्या मूडपेक्षा स्वतःची सोय, शिस्त महत्त्वाची वाटते. मुलांना त्यांच्या सोईप्रमाणं अभ्यास करायचा असतो. त्याऐवजी मुलांना मारून मुटकून अभ्यासाला बसवलं जातं. अशा अभ्यासाचा उपयोग काय?

Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today