प्रत्येकाची अभ्यासाची रीत वेगळी (शिवराज गोर्ल)

शिवराज गोर्ल
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
अभ्यास प्रॉडक्‍टिह हवा, पॉझिटिव्ह हवा. जास्त अभ्यास (पालकांनी) करून घेतला म्हणजे तो जास्त होतोच, असं नाही. उलट मुलं कंटाळतात. रोजच्या अभ्यासाचंही कंटाळवाणं ‘रुटिन’च व्हायला हवं, असं नाही. मुलांना अभ्यासही मजेत करता येईल, अशा युक्‍त्या पालकांनी शोधाव्यात. मुलं अभ्यास किती वेळ करतात, यापेक्षा तो कसा करतात, हे महत्त्वाचं. अभ्यासाला नुसतंच ‘बसणं’ वेगळं आणि अभ्यासात लक्ष ‘असणं’ वेगळं. तासभर मुलांचं अभ्यासाकडं पुरतं लक्ष असेल (आणि तेवढंच ते असू शकतं) तर ती चांगला अभ्यास करतील. चार तास बसूनसुद्धा एकच तास अभ्यासाकडं लक्ष लागणार असेल, तर तीन तास फुकटच. त्यासाठी केलेला आटापिटा, आरडाओरडाही फुकट. हा चार तासांचा अभ्यास नव्हे आभास झाला. त्याऐवजी तासभर अभ्यास, एखादा तास छंदासाठी आणि दोन तास खेळायला दिलं, तर रोज तासभराचा अभ्यास हा खरा चांगला आणि मनापासून होईल. मुलांचा नुसता चांगला अभ्यासच नव्हे, तर चांगला सर्वांगानं विकासही होऊ शकंल. मुलं अभ्यास करताना तीन मार्गांनी ज्ञान मिळवत असतात. एक वाचन करून, दुसरं ऐकून, तिसरं प्रत्यक्ष अनुभव घेऊन. या तिन्ही प्रकारातला एक प्रकार मुलं जरा जास्त प्रमाणात वापरताना दिसतात. आपल्या मुलाचा अभ्यासाचा ‘प्रकार’ कोणता ते पालकांनी पाहावं आणि त्याप्रमाणे अभ्यासावर भर द्यावा. अर्थात, वाचनाइतकंच लेखन, त्याचा सराव महत्त्वाचा.

वाचन म्हटलं, तरी प्रत्येकाची अभ्यासाची रीत वेगळी असते. कुणी मनात वाचतं, कुणाला मोठ्यानं वाचून लक्षात राहतं. मुलांची नेमकी पद्धत कोणती, कुठल्या विषयाचा अभ्यास कशा प्रकारे चांगला होतो, हे ओळखायला मुलांना मदत करावी. अभ्यासाच्या बाबतीत ‘वेळ’ महत्त्वाची असते. प्रत्येकाची अभ्यासाची सर्वोत्तम अशी वेळ असते. कुणाचा सकाळी चांगला अभ्यास होतो, कुणाचा रात्री. मुलांनी आपली सर्वोत्तम वेळ निश्‍चित करावी. आणि ती पाळावी, म्हणजे नियमितपणा येतो... अभ्यासाला एक लय सापडते. अभ्यास ‘छान’ होतो. अशी एक ‘जागा’ ही असल्यास अधिकच उत्तम. त्यामुळं ‘टाइम ॲण्ड प्लेस हॅबिट’ जडते. अभ्यास अंगवळणी पडून जातो.

Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today

टॅग्स