अभ्यासातही विविधता हवी (शिवराज गोर्ले)

सोमवार, 15 एप्रिल 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे" मधील "EDU"या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून..

बालक-पालक
वाचलेलं, शिकलेलं आठवावं यासाठी काही तंत्र असतात, पण खरा अभ्यास कसा होतो? प्रा. आर. एस. जैन म्हणतात, ‘‘खरा अभ्यास हा सर्व ‘पचेंद्रियां’च्या साहाय्यानं व्हायला हवा. अभ्यास करताना आपण फक्त डोळ्यांनी शब्द वाचतो किंवा कानाने ते ऐकतो. ही एका अर्थी निर्जीव प्रक्रिया होय, पण शब्द निर्जीव नसतात. शब्दांना अर्थ असतात. शब्दांची खरी ताकद त्यांच्या ‘अर्था’तच असते. शब्दांमधून गंध, आकार, स्पर्श सूचित होतात. शब्द उच्चारताना हे गंध, आकार, स्पर्श नजरेसमोर किंवा मनात येत नसतील, जाणवत नसतील तर ते धड कळतही नाहीत. मग लक्षात राहणार कसे? घमघमणारा, खडबडीत, महाकाय हे शब्द ‘जाणवायला’ हवेत. ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविता आठवा. कवितेतल्या शब्दांना लय असते, तीही मनात मुरली पाहिजे. तसेच कवितेच्या ‘भावा’चीही अनुभूती यायला हवी. पोवाडा म्हणताना आणि अंगाई म्हणताना वेगवेगळी चित्रं नजरेसमोर येतात; कारण जाणवणाऱ्या भावनाही वेगळ्या असतात. त्यांसह कविता वाचली तर शब्द ‘जिवंत’ होतात. जे वाचलं ते आपोआप ओठांवर आणि मनात रेंगाळतं. म्हणूनच मुलांना अभ्यास करताना अधिकाधिक संवेदनांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करायला हवं.’’

अर्थात, मुळात अभ्यास म्हणजे शिकणं... ज्ञान ग्रहण करणं. त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शंकासमाधान करून घेणं. मुलांच्या मनात नाना शंका, प्रश्‍न येत असतातच... भीतीपोटी, अज्ञान झाकण्यासाठी मुलं त्या विचारत नाहीत. मुलांना शंका विचारण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. त्याचं निवारण केलं पाहिजे. त्यांना सुचलेल्या कल्पनाही शब्दात मांडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अभ्यास विविध पद्धतीनं करता येतो, हे आपण लक्षातच घेत नाही. आपण शिकलेला विषय दुसऱ्याला शिकवणं हाही एक उत्तम मार्ग असतो. त्या प्रयत्नात आपला तो विषय पक्का होत जातो. मुलांना एकमेकांचा असा ‘अभ्यास घ्यायला’ प्रवृत्त करावं. सोबतीमुळं उत्साहही वाढतो. लेखन, वाचनाबरोबरच, स्वतः करून बघणं, स्वतः अनुभव घेणं महत्त्वाचं असतं. तो शाळेत शक्‍य होतंच असं नाही, मात्र घरी ते जमू शकतं. पाठ्यपुस्तकात मुलांना विविध विषयांतल्या अनेक संकल्पना नव्यानं कळत असतात. त्यांना त्या मुळात समजल्यात का हे पालकांनी बघायला हवं. एक मात्र खरं, पालकांनी मुलांना अभ्यासात आवश्‍यक तिथंच मदत करावी.