गृहपाठ हा स्वाध्याय असायला हवा

बुधवार, 17 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मुलांना शाळेतून गृहपाठ का दिले जात? ते भले आवश्‍यक असतील पण मुलांना ते नको असतात त्याचं काय? ‘पालकत्व’मध्ये सुमन करंदीकर या संदर्भात दिशादर्शक करताना म्हणतात, ‘‘गृहपाठाला जे काही महत्त्व प्राप्त झालंय ते मुख्यतः लेखी परीक्षेच्या वर्चस्वामुळे. त्यातून रूढ झालेली पाठ प्रश्‍नोत्तरांची यांत्रिकता आणि आशय न कळताही प्रश्‍नांची उत्तरं लिहिण्याची सवय लावणारा प्रश्‍नोत्तरांचा ससेमिरा!’’ खरं तर गृहपाठ हा मुलांनी आवडीनं करायला हवा. त्यातून मुलांना स्वतः अभ्यास करायची सवय लागावी, अभ्यासाची कौशल्यं मुलांनी मिळवावीत, हे अभिप्रेत असतं.

प्रत्यक्षात गृहपाठ ही एक गुंतागुंतीची, नावडती बाब होऊन बसली आहे. या गुंतागुंतीतून बाहेर पडायचं असेल तर मुलांच्या कुतूहल आणि जिज्ञासेवर विश्‍वास हवा. शिकण्याला काही हेतू असेल तरच मुलं काही वेगळा विचार करायला प्रवृत्त होतात. शेवटी जिज्ञासा महत्त्वाची. तिच्याशिवाय शिक्षण होऊच शकत नाही. शिक्षण म्हणजे स्वयंअध्ययन! मुलांच्या मनात अनेक प्रश्‍न असतात. त्यांना त्या प्रश्‍नांची उत्तरं शोधायची असतात. त्याचप्रमाणे नवे नवे प्रश्‍न निर्माण करणाऱ्या माहितीतही ती रंगून जात असतात. असं होऊ लागलं की शिकण्याचं ओझं न वाटता ती गंमत वाटायला लागते. ही गंमत मुलांना अनुभवायला देणं, हे खरं गृहपाठाचं एक महत्त्वाचं कार्य आहे.

यासाठी मुलांना स्वतः काम करण्याची व स्वतःचं वेगळेपण व्यक्त करण्यासाठी संधी मिळायला हवी. पाठ्यपुस्तकातील आयत्या माहितीपेक्षा निरीक्षण, पडताळणी, इतरांशी चर्चा यातून वेगळी माहिती त्यांना शोधावी लागेल असं काम द्यायला हवं. तयार उत्तर पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना स्वतःलाच निरीक्षण करायला लावणारे आणि त्यातून त्यांनीच उत्तरं शोधावीत, असे खुले प्रश्‍न द्यायला हवेत. शाळेच्या सध्याच्या व्यवस्थेत येणाऱ्या साचेबंदपणातून बाहेर पडायला हवं. शिक्षक व पालकांनी अभ्यासाकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी. अर्थात हे काम मुलांच्या खेळण्याच्या गरजेवर, त्यासाठीच्या वेळावर अतिक्रमण करणार नाही एवढंच हवं किंबहुना हे कामही जेव्हा मुलांना खेळ वाटेल तेव्हा गृहपाठाची कटकट संपुष्टात येईल.