मुलांच्या बुद्धीवर ओझं लादू नका

Education
Education

बालक-पालक
मुलं शिकतात कशी? शाळेत मुलांना जी माहिती मिळते, ती एकत्रित होऊन त्यांच्या मनःपटलावर प्रतिमा रूपाने ठसते. ती प्रतिमा पुढे स्मृतिकोषात साठवलं जाते. ही वर्किंग मेमरी असते. या साठवल्या जाणाऱ्या प्रतिमा मुलाला महत्त्वाच्या वाटल्या तरच त्या दीर्घकालीन स्मृतिकोषात म्हणजे लाँग टर्म मेमरीमध्ये जमा होतात. अर्थात प्रथम कुठल्याही माहितीचं नीट आकलन व्हावं लागतं. मुलांना विषय नीट कळला नसला तर मुलं फक्त घोकंपट्टी करून ते परीक्षेत उतरवतात.

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी पूर्वीच म्हणून ठेवलं होतं, हल्लीचे विद्यार्थी मनाच्या घमेल्यात ज्ञानाचे दगड भरून ती घमेली परीक्षागृहात नेऊन पालथी करतात. आज इतक्‍या वर्षांनंतरही तीच परिस्थिती आहे. आता तर ज्ञानाचे नसतात, माहितीचेच दगड असतात घमेल्यात. पेपरात घमेली पालथी केली की पुन्हा रिकामी. जेव्हा मुळातच प्रयत्न हा माहिती तात्पुरती लक्षात ठेवण्याचा असतो तेव्हा ती कायम उपयोगासाठी आठवणीत राहूच शकत नाही. मुलांच्या मेंदूवर अति माहितीचा मारा केला जातो तेव्हा त्यांची तारांबळ उडते. या माहितीसाठी अल्पकालीन स्मृतिकोषात पुरेशी जागाच नसते. मग नव्या माहितीला जागा कुठे देणार अन्‌ प्रक्रिया कशी करणार?

जितकी जास्त माहिती, जितक्‍या कमी वेळात शिकायची तेवढी तिची वर्किंग मेमरीत म्हणजे चालू स्मृतीत प्रक्रिया करणं कठीण होतं. हे जे अतिरिक्त ओझं बुद्धीला पेलावं लागतं त्याला आकलनाचा बोजा म्हणतात. हे आकलनाच्या बोजाचं बौद्धिक ओझं मुलांवर आपणच लादत असतो. त्यामुळे, म्हणजे मुख्यतः अति माहितीमुळे आकलनातच अडचण निर्माण होते.

समजण्याचे प्रमाण कमी होऊन शिकण्यातच अडथळा निर्माण होतो.
मात्र पालकांनी तर मुलाला लवकरात लवकर जास्तीत जास्त शिकवून जगाच्या स्पर्धेत उतरण्याचा वसाच घेतलेला असतो. नर्सरीतल्या मुलांनाही मारून मुटकून अभ्यास करायला सांगितलं जातं. बालवाडीपासून अभ्यासाचा जो ताण सुरू होतो, तो थेट दहावीपर्यंत... अर्थात पुढेही तो असतोच.

आपल्याला मुलांच्या खांद्यावरचं/पाठीवरचं दप्तराचं ओझं दिसतं, पण हे बौद्धिक ओझं मात्र दिसत नाही. तेव्हा पालक/शिक्षक दोघांनी विचार करायला हवा. मुलाच्या मेंदूला न पेलणारं, त्याच्या शिकण्याच्या, समजून घेण्याच्या प्रक्रियेत गोंधळ उडवणारं, बौद्धिक ओझं आपण त्याच्या लादतो आहोत का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com