शिस्त - तेव्हा आणि आता (शिवराज गोर्ले)

शिस्त - तेव्हा आणि आता (शिवराज गोर्ले)

बालक-पालक
जुन्या काळातील मंडळींचा शिस्तीविषयीचा दृष्टिकोन आणि आजचा आधुनिक दृष्टिकोन यातील फरक मानसतज्ज्ञ असा स्पष्ट करतात, पूर्वीच्या काळातील शिस्त ही कडक असे. दरारा निर्माण करणारी असे. तिथे पालकांचा शब्द अंतिम असे. मुलांना काही बोलण्यासही मुभा नसे. पालक अयोग्य कृती तर थांबवीतच, पण पोरांच्या इच्छाही दाबून, दडपून टाकीत. भिंतीवर चित्रं काढायची नाहीत म्हणजे नाहीत...एवढ्यावरच भर असे. मुलानं ती कागदावर काढली तर काय हरकत आहे, हा विचारच नसे. जी काही बंधनं घातली जात, ती सांगून, समजावून नव्हे, तर ओरडून सांगितली जात. अन्यथा मुलं ऐकणार नाहीत, असा समज. अशी शिस्त म्हणजे धाक, असं समीकरण असे. मुलांना बोलू देणं तर दूरच, उलट त्यांना मूर्खात काढलं जाई. त्यांना ‘लागेल’ अशा कठोर शब्दांत बोललं जाई. मुलांचं चुकलं तर, ‘तुझं हे साफ चुकलं... असं पुन्हा करायचं नाहीस’ असं सांगण्यापेक्षा ‘तू उनाड, बेअक्कल आहेस,’ असा त्यांच्यावर ठपकाच ठेवला जाई. आणखी एक म्हणजे मुलं जेव्हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नसत...नाराज व धुसमुसत असत, तेव्हाच त्यांना ‘सुनावलं’ जाई व शिस्त लावली जाई. साहजिकच मुलांना शिस्त नकोशी, अप्रिय वाटत राही. अशा परिस्थितीत ही शिस्त आपल्याच भल्याची आहे असा विचार मुलांच्या मनात येईल तरी कसा?

शिस्तीबद्दलचा नवा दृष्टिकोन अर्थातच वेगळा आहे. शिस्त म्हटली, की काही नियम आले, बंधनं आली. काही गोष्टींना मनाई करावी लागते. काही मर्यादा घालाव्या लागतात, पण मर्यादा या मुलांच्या वागण्यावर किंवा कृतींवर घालता येतात. त्या आवश्‍यक तिथे जरूर घालाव्यात, पण त्याचवेळी मुलांच्या इच्छा आणि भावना यांच्यावर मर्यादा घालता येत नसतात याचंही भान हवं. म्हणजेच मुलांचं वागणं आणि मुलांच्या भावना यांतील फरक ओळखायला हवा आणि या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळायला हव्यात.

समजा तुमच्या मुलानं (ओरडावं, ‘करू नकोस’ म्हणावं असं) काहीच केलं नाहीय, तरी तो नुसताच रुसून बसला असेल तर त्याची भावना जाणून घ्यायला हवी. ती व्यक्त करायला त्याला मोकळीक द्यायला हवी. आपण लावलेल्या ‘शिस्ती’चा त्याला राग आला असेल तर तोही समजून घ्यायला हवा आणि ‘ही शिस्त कशासाठी’ ते त्याला समजावून सांगायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com