शिस्तीचे नियम (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले
गुरुवार, 25 एप्रिल 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "EDU" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून..."

बालक-पालक
शिस्त लावताना कौतुक आणि टीका...शाबासकी आणि शिक्षा या दोन्हींचा वापर केला जातो, पण खरा प्रभाव कशाचा पडतो?

हे कळण्यासाठी थोडं शिस्तीचं मानसशास्त्र समजून घ्यायला हवं. मानसतज्ज्ञ स्किनरनं त्यासाठी द रिएन्फोर्समेंट थिअरी मांडली आहे. तीनुसार एखाद्या वागणुकीसाठी प्रोत्साहन मिळालं तर ती वागणूक स्थिरावते... पक्की होते.... तसं वागण्याची सवय लागते. ज्या घटकांचं प्रोत्साहन मिळतं, त्याला प्रबलक असं म्हणतात. असा प्रबलक नसेल म्हणजेच प्रोत्साहन नसेल, तर ती वागणूक लोप पावतो. या एकाच सिद्धांताभोवती शिस्तीचं मानसशास्त्र गुंफलेलं आहे.

शाबासकी, प्रशंसा, बक्षीस हे प्रबलक आहेत. चांगल्या वर्तनाबद्दल शाबासकी आणि चुकीच्या वर्तनाबद्दल नापसंती (आवश्‍यक तेव्हाच शिक्षा!) हे समीकरण मुलाच्या मनावर ठसत राहिलं, तर साहजिकच त्याचा कल चांगल्या वागण्याकडं होतो, त्याची मानसिक वाढ योग्य दिशेनं होत राहते व त्याला योग्य शिस्तही लागते. मात्र त्यासाठी पालकांनी स्वतः काही शिस्त पाळायला हवी. मुलांनी नियम पाळावेत ही अपेक्षा असेल तर स्वतः काही नियम पाळायला हवेत.

योग्य शिस्तीचे नियम
कुठलाही नियम ठरवण्यापूर्वी मुलांशी चर्चा करावी, त्यांची मतं समजून घ्यावीत.
त्यानुसार त्यांच्यापुढं पर्याय ठेवून, त्यातून हवा तो निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांना द्यावं.
जो निर्णय होईल, तो का आवश्‍यक आहे, त्यात मुलांच्या हिताचा विचार कसा आहे ते पटवून द्यावं. मुलांच्या कुवतीनुसार अपेक्षा असाव्यात.
मात्र एकदा निर्णय मुलांना माहिती झाला, की त्याची निग्रहानं अंमलबजावणी करावी.
एकदा निर्णय ठरला की तो बदलायचा नाही. बदलायचा झाला तर त्यासाठी योग्य असं कारण हवं. (अन्यथा निर्णयाचं हसंच होतं.)
मुलं ही अनुकरणप्रिय असल्यानं पालक स्वतः ठरलेल्या नियमाचं कसं पालन करतात, यातूनच ती खूप काही शिकत असतात. बेशिस्त, बेफिकीर पालक मुलांनाही शिस्त लावू शकत नाहीत!
कोणत्याही नियमबाह्य वर्तनाबद्दलची शिक्षा किंवा नियम पालनाबद्दल प्रशंसा, ही ताबडतोब व्हावी.
शिक्षा ही घटनेला साजेशी हवी. प्रमाणात हवी. घटना व शिक्षा यात संगती हवी. शिक्षा कधीही अवाजवी किंवा अतिरिक्त असू नये. अतितीव्र असू नये, तशी अतिसौम्यही असू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shivraj Gorle Edu Supplement Sakal Pune Today