उत्तम भावनांक हीच यशाची गुरुकिल्ली (शिवराज गोर्ले )

शिवराज गोर्ले 
शनिवार, 11 मे 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
आजवर शिक्षण क्षेत्रात बुद्‌ध्यंकाचीच... म्हणजे ‘आयक्‍यू’ची मक्तेदारी होती, कारण शैक्षणिक यशाशी बुद्‌ध्यंकाचा स्पष्ट, घनिष्ठ संबंध होता. स्मरणशक्ती, आकलनशक्ती हे बुद्‌ध्यंकावर अवलंबून असणारे बुद्धीचे पैलू परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी काम येत असतात. मात्र, बुद्‌ध्यंकाचा आधारे मानवी क्षमता मोजता येत नाहीत, कारण सर्वच क्षमता बुद्‌ध्यंकाच्या आवाक्‍यात येऊ शकत नाहीत. गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे जे आठ प्रकार स्पष्ट केले. त्यातील जेमतेम दोन म्हणजे भाषिक/वाचिक बुद्धिमत्ता व तार्किक/गणिती बुद्धिमत्ता, याच आयक्‍यू टेस्टमध्ये मोजता येतात.

बुद्‌ध्यंकाच्या आधारे मिळवता येणारे परीक्षांमधले गुण आणि प्रत्यक्ष आयुष्यातले यश यांचा तसा काही परस्परसंबंध असतोच असं नाही. प्रत्यक्षात असं दिसतं की, व्यक्तीच्या आयुष्यातलं यश हे व्यक्तिगत क्षमतांवर अवलंबून असतं. याच क्षमतांना आता भावनिक बुद्धिमत्ता मानलं जातं. या बुद्धिमत्तेचं मोजमाप आता भावनांकाद्वारे (इमोशनल कोशंट - इ.क्‍यू.) केलं जातं. उत्तम बुद्‌ध्यंक असेल, पण भावनिक बुद्धिमत्ता कमी असल्यास माणूस जीवनात (अनेकदा परीक्षांतही) यशस्वी होऊ शकत नाही, कारण मनुष्य जेव्हा भावनिकदृष्ट्या स्थिर असतो, तेव्हाच योग्य विचार करू शकतो व बुद्धीचा पुरेपूर वापर करू शकतो. माणसामध्ये इतर प्राण्यांसारखाच जुना मेंदू आहे तसाच प्रगत माणसाचा नवा मेंदूही आहे, ज्याला प्रिफ्रन्टल लोब असं म्हटलं जातं. हा प्रिफ्रन्टल लोब म्हणजे जणू राजा असतो. राजाला शिस्त हवी असते. संवेदना जुन्या मेंदूकडून नव्या मेंदूकडे जाताना भावनिक शिस्त येते. मग राजा ही योग्य निर्णय घेऊ शकतो. हीच भावनिक स्थिरता, बुद्धिमत्ता, प्रगल्भता होय. अनेक वर्षांच्या अभ्यास व निरीक्षणांच्या आधारे डॅनिअल गोलमन यांनी यशाचं रहस्य उलगडताना म्हटलं आहे, यशामध्ये बुद्‌ध्यंकाचा वाटा जेमतेम २० टक्के असतो, तर भावनिक बुद्धिमत्तेचा ८० टक्के. 

तात्पर्य - मुलांनी फक्त परीक्षेत भरपूर गुण मिळवावेत असं नव्हे, तर आयुष्यात भरपूर यश मिळवावं असं वाटत असल्यास शिक्षणात, मग ते शाळेतलं असो की घरातून मिळणारं, मुलांची भावनिक बुद्धिमत्ता जोपासण्यावर भर असायला हवा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today