खरी शिस्त फटक्‍यांशिवाय!

Education
Education

बालक-पालक
फटक्‍यांशिवाय लागते ती खरी शिस्त, मात्र मुलांना ती लागावी यासाठी पालकांनीही काही शिस्त पाळावी लागते. त्यासाठीच्या या काही टिप्स - 

पुढच्या वेळी सौम्य व्हा
सर्व मुलांशी एकाच तऱ्हेनं सरसकट वागून चालत नाही. डॉ. अनुराधा सोवनी म्हणतात, ‘‘मुलाचं वय कितीही असो, त्याची समजुतीची, जबाबदारीची जाणीव जशी असेल तशी त्याला वागणूक मिळायला हवी. मात्र जस जसं ते जबाबदारीनं वागू लागेल, तसतशी पालकांनी वागणूक बदलावी. चुका मुलांच्या होतात, तशा पालकांच्याही होऊ शकतात. कळतं पण वळत नाही, हे त्यांच्याही बाबतीत घडू शकतं. रागाच्या भरात कडक भाषा वापरली जाते, क्वचित फटका दिला जातो... पण त्यानंतर जाणवलं पाहिजे की, हे आपलं चुकलं. असं भले दहा वेळा घडंल... पण त्यातून पालकांचं वागणं बदलू शकेल.’’

शिक्षेचे प्रकार शोधा
प्रत्येक मुलासाठी शिक्षा वेगळ्या पद्धतीची हवी. फटका देण्याचे मुलांच्या मनावर खूप विपरीत परिणाम होत असतात. प्रा. ज्योत्स्ना ठाकूर म्हणतात, ‘‘ती स्वतःला बंद करून घेतात. परिणामी त्यांच्या खाण्यापिण्यापासून झोपेपर्यंत सगळं तंत्र बिघडू शकतं. मुलांना मारणारच नाही, असा निग्रह प्रत्येक आई-वडिलांनी करायला हवा. शिस्त तर लावायला हवीच... त्यासाठी काही शिक्षाही हवी... पण मुलांच्या स्वभावानुसार शिक्षेचेही वेगवेगळे प्रकार पालकांनी शोधायला हवेत. ते शोधले तरच सापडतात. मात्र आपलं न ऐकल्यानं त्याला काही लागलं, त्रास झाला, अपयश आलं तर ‘त्यावेळी तरी मी सांगत होते,’ हे न बजावता त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

प्रेमापोटी फटके नकोत!
बालमानसतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर म्हणतात, ‘‘मुलानं इलेक्‍ट्रिक पॉइंटमध्ये, पंख्यात हात घातल्यास त्याच्या सुरक्षेसाठीच ती चूक किती भयंकर आहे, हे त्याला सांगून त्याला फटका दिल्यास त्यालाही गांभीर्य ध्यानात येतं. पण जेवण्यासाठी वा अभ्यासासाठी मारणं हा उपाय होऊच शकत नाही. माराचे बालमनावर, पुढं त्याच्या आत्मप्रतिमेवर ओरखडे उठतात, ते शेवटपर्यंत टिकतात. दुसरं म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्याला राग आला की मारायचं असतं, हा चुकीचा धडा घालून देतो. ‘मी प्रेमापोटीच  मारलं,’ हा पालकीय युक्तिवादही फसवा आहे. मारातून त्यामागचं प्रेम मुलांपर्यंत कसं पोचेल? प्रेमापोटी फटके देण्यापेक्षा प्रेमापोटी प्रेमच करा ना!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com