‘होय, माझी चूक झाली’

Education
Education

बालक-पालक
‘शिक्षा आणि शिस्त’ या संदर्भात बालसमुपदेशक गंपूदादा आणि किशोरीताई यांनी ‘चौकट’ ही संकल्पना मांडली आहे, ती समजून घेऊ. मुलांना शिक्षा केव्हा केली जाते? काय कारणं असतात शिक्षेची? तर, आमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, उलट उत्तरं देतो, घरात पसारा करतो, नीट जेवत नाही, इतरांच्या खोड्या काढतो, शाळेतून सारख्या तक्रारी येत असतात. कपडे, पुस्तकं, वह्या, खेळणी जागच्या जागी ठेवत नाही. बाहेर जाताना वेळेवर तयार होत नाही आणि अर्थातच हट्ट करतो.

ही सगळी कारणं म्हणजेच पालकांनी मुलांसाठी आखलेली एक चौकट असते. मूल चौकटीत राहिलं तर शिक्षा नाही; चौकट मोडली, की शिक्षा. थोडक्‍यात, शिक्षेची भीती हा महत्त्वाचा भाग ठरतो. ही भीतीच संपली, की नियम, अर्थात चौकट तोडली जाते. मग शिक्षा आलीच. ‘समुपदेशक’ इकडंही लक्ष वेधतात, की अनेकदा मुलांचं कुतूहलही शिक्षेला कारणीभूत ठरतं. मुलाला प्रत्येक गोष्ट स्वतः करून पाहायची असते, तर पालकांच्या स्पष्ट सूचना असतात, ‘हे करू नकोस...’ पालकांचं न ऐकता ती करून बघितली की शिक्षा ठरलेली. दुसरा महत्त्वाचा भाग ः मुलांना त्यांचे नकार थेट आई-बाबांपर्यंत पोचवता येत नाहीत. कारण ते मोठे असतात. मग मुलं त्यांच्या नकार पोचवण्यासाठी ‘करू नको’ म्हणून सांगितलेली गोष्ट मुद्दामहून करतात.

म्हणजे अर्थातच शिक्षा! इथला महत्त्वाचा भाग असा आहे, शिक्षेच्या भीतीपोटी मुलं ऐकतातही, पण शिक्षेची भीती कमी होईल, तसं शिक्षा कशासाठी झाली याला महत्त्व न राहता फक्त शिक्षा झाली, एवढंच लक्षात राहील. शिस्त म्हणजे काय तर ‘मुलांना चौकटीत बसवताना त्यांना शिकू देणं, त्यांचं कुतूहल शमवणं, त्यांना मदतीचा हात देत योग्य त्या गोष्टींपर्यंत पोचविणे म्हणजे शिस्त. 

‘काय करावे अन्‌ काय करू नये,’ हे समजण्यासाठीचा योग्य निर्णय घ्यायला मुलाला मदत करणे म्हणजे शिस्त. उदा. ‘अरे, कपडे घरभर टाकू नकोस,’ असं ओरडण्याऐवजी ‘कपडे असे घरभर टाकणे योग्य आहे का?’ असा प्रश्‍न विचारल्यास मुलाकडून ‘नाही’ हेच उत्तर येणार असतं. गंपूदादांच्या शाळेत शाळा सुटताना एक ॲक्‍टिव्हिटी असते. मुलांनी दिवसभरात काय चुका केल्या, हे प्रामाणिकपणे सांगायचे असते. प्रामाणिकपणाबद्दल त्याचं कौतुक केलं जातं. अट मात्र एकच असते ः ती चूक परत करायची नाही, नवी चूक करायला हरकत नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com