संस्कारांमुळेच ‘माणूस’ घडतो...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते.

आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत नसतात; (पालकांच्या) वागण्यातून होत असतात. मुलं ‘ऐकत’ नसली तरी पालक स्वतः कसे वागतात, हे ती ‘पाहत’ असतातच.

म्हणजेच, ठरवून ‘केले’ नाही तरी मुलांवर संस्कार होतच असतात. त्यामुळे ते योग्य होत आहेत की नाही, हे तर पाहावंच लागतं. ‘पालक’ म्हणवणाऱ्याचं ते कर्तव्यच असतं. अर्थात हेही खरं की, आजच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात हे पाहणं अवघड झालंय. त्यातच टीव्ही, इंटरनेट, मोबाईल फोन हे सर्वच मुलांच्या भावविश्‍वात प्रचंड वेगानं उलथापालथ घडवीत आहे. बदलत्या काळात मुलांवरील संस्कार ही एक अवघड बाब बनून बसली आहे. हे सगळं असलं तरी मुलांवरील संस्काराचं महत्त्व कमी झालेलं नाही. किंबहुना ते वाढलंच आहे. चहूबाजूंनी होत असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांना समर्थपणे पेलण्यासाठी त्यातही स्वतःचं वेगळेपण, माणूसपण जपण्यासाठी मुलांचं मन, मेंदू, बुद्धी सारंच सशक्त हवं. दृढ, सखोल, सुयोग्य संस्कारांची आज कधी नव्हे, इतकी मोठी गरज आहे. आजच्या ‘इन्स्टंट’च्या जमान्यात, सारं काही झटपट मिळवण्याच्या मोहातून मुलांना वाचवू शकतील ते उत्तम संस्कारच.

संस्कार केले जातात म्हणूनच माणसाच्या मुलाला ‘माणूस’ म्हणता येतं. अन्यथा ते प्राणी पातळीवरच राहिलं असतं. हिंदू संस्कृतीमध्ये तर माणसाच्या जन्मापासून ते अंत्यसंस्कारांपर्यंत सोळा संस्कार सांगितले आहेत. तसे हे सर्व ‘व्यवहार’च असतात, तरीही आपल्या द्रष्ट्या कवींनी सुंदर मंत्र रचून त्यांचे संस्कार समारंभ केले. जीवनातल्या प्रत्येक उपयुक्त कृतीला सुंदरतेनं नटवावं, ही रवींद्रनाथांचीही कल्पना होती. माणूस सुसंस्कृत कधी होतो? संस्कृतीच्या कल्पनेतच मुळी सौंदर्यकल्पनेचा अंतर्भाव आहे. सौंदर्याचा अनुभव घेण्याचं सामर्थ्य वाढवणं आणि जीवनातली अंतर्बाह्य कुरूपता नाहीशी करणं हेच तर शिक्षणाचं, संस्कारांचं उद्दिष्ट असतं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today