संस्कार करावेत कसे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
‘संस्कार’ अगदी कोवळ्या वयापासून सुरू होत असतात. जन्माला आल्यानंतर मुलाची जी सर्वतोपरी काळजी घेतली जाते, ते लाड होतात त्यातून कळत-नकळत छोटं मूल हे ‘सुखवादी’ बनत असतं. ‘सारं काही माझ्यासाठी आहे,’ ही भावना त्याच्या मनात बळावत असते. विशेषतः

सतराव्या-अठराव्या महिन्यापासून मूल ही भावना काहीशा आक्रमकपणे व्यक्त करू लागतं, ‘सगळं माझ्या मनासारखं झालं पाहिजे... मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे... ताबडतोब,’ अशा स्वरूपात. मुलाच्या मनातील ही भावना काबूत ठेवण्याचं काम पालकांनी जिद्दीनं हाती घ्यावं लागतं.

इथंच मुलांवरील संस्काराचा प्रारंभ होतो.
नकाराचा स्वीकार हाही एक मोठा संस्कार आहे.

संस्कार म्हणजे काय तर आपल्या नैसर्गिक ऊर्मीवर नियंत्रण ठेवता येणं. भूक नैसर्गिक असते. संयम हा संस्कार असतो. स्वार्थ नैसर्गिक असतो, सहकार्य हा संस्कार असतो.

आपल्या अनेक इच्छा, सहजप्रवृत्ती रोखता येणं, आपल्याला हवी ती गोष्ट मिळण्यास विलंब झाला तरी तो सहन करता येणं. सहज सुलभ... उपजत भावनांना मुरड घालण्याची शक्‍यता आणि विचार... फक्त माणसाच्या बाबतीतच संभवतो. कारण माणूसच आपल्या भावनांविषयी ‘विचार’ करू शकतो... त्या योग्य वा अयोग्य ठरवू शकतो. म्हणूनच ‘होय-नाही’चा विवेक माणूस करू शकतो. जे हा विवेक सोडतात, ते चोरी, अत्याचार अशा वाममार्गांना जातात. म्हणूनच मुलांवर ‘विवेका’चा संस्कार व्हायला हवा!

अर्थात, मुलांच्या बाबतीत या ‘विवेका’चा प्रारंभ युक्तीयुक्तीनं ‘आस्ते कदम’च होऊ शकतो, तरीही तो जेवढा लवकर सुरू होईल तेवढा बरा!
हे झाले प्राथमिक संस्कार, मात्र पुढं संस्कारांचा संबंध ‘मूल्यां’शी येतो.

त्यामुळं त्याचा स्वतंत्र विचार अपरिहार्य ठरतो. आजकाल समाजात ढासळत चाललेल्या ‘मूल्यां’विषयी खूप बोललं जातं, असंही आवर्जून म्हटलं जातं, की हे ढासळणं थोपवू शकतील ते पालकच. घराघरांतून भावी पिढीला घडवू शकणारे सुजाण, जबाबदार पालक! तेव्हा पालकांवर ही मोठीच जबाबदारी आहे, मुलांमध्ये योग्य मूल्य रुजविण्याची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today