संस्कार रुजतात ‘अनुभवा’तून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मुलांवर खरे संस्कार होतात ते पालकांच्या वागण्या-बोलण्यातून. मुलांनी अनुकरण करावं असं नैतिक वर्तन ठेवणं नेहमी सोपं नसतं, पण तरीही अंतिमतः तेच योग्य ठरतं. त्यासाठी प्रसंगी काही नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी लागते. हे मुलांना केवळ सांगून कळत नसतं, वळतही नसतं. पालक अशा प्रसंगी एकाच नव्हे, तर अनेक प्रसंगांत ठाम राहत असल्यासच मुलं ते वागणं स्वीकारतात. हेच योग्य, अशी त्यांची खात्री पटावी लागते. ते त्यांना मनोमन पटावं लागतं.

मुलांच्या नैतिक विकासाची गुरुकिल्ली पालकांच्या हातात असते. त्यासाठी प्रथम पालकांनी स्वतःची मूल्यं कोणती, हे ठरवावं लागतं. पालकांना स्वतःच्या मूल्यांबाबत पुरेशी स्पष्टता असेल, तरच ते योग्य ती मूल्यं मुलांपर्यंत खंबीरपणे व सजगतेनं पोचवू शकतात. तशी स्पष्टता नसल्यास ‘आपण आपल्या परीनं शक्‍य तितकं तत्त्वानं वागायचा प्रयत्न करायचा, बाकी मग...’ अशी मुळातच तडजोडीला वाव ठेवणारी भूमिका मुलांसमोर ठेवली जाते. मुलांवर संस्कार कसे करावेत, याची दिशा दर्शविताना प्रवीण कुलकर्णी म्हणतात, ‘‘पालकत्व निभावताना संस्कारक्षम मुलांच्या मनाचा, कलाचा आणि स्वभावाचा विचार करून सतत डोळस प्रयत्न करत राहणं म्हणजे सुजाण पालकत्व. ती काही एखादी इव्हेंट नव्हे, की ठराविक कालावधीनंतर फुलस्टॉप! संस्कार हे क्‍लासमध्ये शिकवले जाऊ शकत नाहीत. संस्कार चार संस्कृत श्‍लोक पाठ करून येत नाहीत, संस्कार हे आचरणातून यावे लागतात. संस्कार एखादा विधी केल्यासारखा आवरायचा नसतोस तर तो नियमिततेनं उपयोजून, त्याचं गुणांमध्ये व्हर्च्यूमध्ये रूपांतर व्हावं लागतं. असं होतं तेव्हाच संस्कारातून मूल्य रुजलं, असं म्हणता येतं.

संकुचित असू नये, विशाल दृष्टिकोन ठेवावा, सुसंस्कृत वागावं, बोलावं असे संस्कार मुलांवर करायचे असतील तर पालकांनी स्वतःचं वर्तन तपासून त्यात जाणीवपूर्वक सकारात्मक बदल घडवून आणायला हवेत. आम्ही असेच राहू, काय बदलायचं ते मुलांनी, हे कसं चालेल?’’ 

याच संदर्भात गोपाळ बेळे सुचवतात, ‘प्रत्येक मूल्याचं अधिष्ठान भावना हेच असतं. त्यामुळं मूल्य जोपासण्यासाठी फक्त वैचारिक नव्हे, तर भावनिक अनुभव मुलांना द्यायला हवेत. खराखुरा भावनिक अनुभव वारंवार घेऊनच मूल्यं स्थिर होतात. उदा. एखाद्या गरीब मुलाशी मैत्री करणं, त्याला मदत करणं, त्याच्या उत्कर्षातून आनंद घेणं यातूनच मैत्री, माणुसकी ही मूल्यं रुजतात. अन्यथा. ती फक्त पोपटपंची ठरते.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today