मुलं चुकीचं वागतात, तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
पालकांनी आपलं वर्तन अनुकरणीय ठेवावं, हा भाग तर आहेच, पण मुलं चुकीचं वागतात, त्या वेळी पालक त्यांच्याशी कसं वागतात, हेही महत्त्वाचं असतं. तुमच्या मुलानं कुणाची तरी अथवा कुठून तरी एखादी वस्तू चोरून आणली आहे, हे तुम्हाला कळल्यास तुम्ही काय कराल? प्रचंड संतापाल? थयथयाट कराल? करू नका, डॉ. गिनोट सुचवतात, थयथयाट करण्याची गरजच नसते. शक्‍य तितक्‍या शांतपणे, तितक्‍याच ठामपणे, ‘जा, ते परत कर किंवा जिथून उचललंस तिथं ते परत ठेवून ये,’ असं सांगावं.

या मागचं लॉजिक असं - मुलं जात्याच चोर नसतात. क्षणिक मोहातून ती चोरी करतात. आपण करतोय ते गैर आहे, हे त्यांनाही माहिती असतंच. फक्त आपण पकडले जाणार नाही, अशी त्यांची अटकळ असते. पण पकडले गेल्यावर ते चोरीचं समर्थन करीत नाहीत. ओशाळतात, अर्धमेली होतात.

तेव्हा चोरलेली वस्तू मुकाट्यानं परत करायला केव्हाही तयार असतात. ‘चोरी चालणार नाही’ हा धडा आणि चोरीची वस्तू परत करण्याची कृती, या दोन गोष्टी महत्त्वाच्या. थयथयाट, लेक्‍चर, शिक्षा हे पहिल्या वेळी तरी गरजेचं नसतं. एकदा करून तर पाहा! दुसरं, मुलांचं खोटं बोलणं. मुलं खोटं बोलतात याची पालकांना प्रचंड चीड येते. डॉ. गिनोट यांच्या मते अनेकदा मुलांना खोटं बोलण्यासाठी पालकच उद्युक्त करीत असतात. एखादी चूक मुलानं केलीय हे स्पष्ट असतानाही ‘खरं सांग!’ म्हणत त्याला खोटं बोलण्याची संधी देऊ नये. मुलं बहुतेक वेळा खोटं बोलतात ती शिक्षेच्या, माराच्या भीतीनं. एका अर्थी खरं बोलण्याची मुभा नसते म्हणून मुलं खोटं बोलत असतात. हे मुलांचं ‘डिफेन्सिव्ह लाइंग’ असतं. त्यासाठी आपणच त्यांना उद्युक्त करीत असतो.

आपण चूक कबूल केली तर आई-बाबा भले रागावतील, पण सॉरी म्हटल्यावर माफ करतील... आणि काय वाटेल ते झालं तरी मारणार नाहीत, अशी खात्री असल्यास मुलं खरं बोलण्याची दाट शक्‍यता असते.

पालक मुलाला नम्रता कशी शिकवतात, हेही पाहण्यासारखं असतं. त्यासाठी प्रसंगी चारचौघांसमोर खडसावयलाही मागंपुढं पाहत नाहीत. ‘उलट उत्तरं देतोस? फार शिंगं फुटली का तुला?’ हा नम्रता शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग नक्कीच नव्हे. कारण त्यात नम्रतेचा मागमूसही नाही. नम्रता शिकवायची असल्यास ती नम्रतेतंच शिकवायला हवी. मुलं खरी नम्रता शिकतात ती पालकांच्या नम्र आणि सौजन्यपूर्ण वागण्या-बोलण्यातून. त्यात पालकांचं स्वतःच्या मुलांशी वागणंही आलंच. मुलांनाही स्वतःच्या चुकांची जाण असतेच. त्यांना ओरडल्याशिवाय, शिक्षा केल्याशिवाय ती सुधारतच नाहीत, असं पालकांनी समजू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today