मुलं आक्रमक का होतात?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
खरं तर प्रत्येक मुलात (प्रत्येक माणसात) काही प्रमाणात आक्रमकता असतेच... पण ती प्रमाणातच असावी लागते. ठामपणा आणि आक्रमकता यात फरक असतो. कुणी खेळणं घेतलं तर ‘हे माझं खेळणं आहे, तू घ्यायचं नाहीस,’ हा ठामपणा झाला. पण त्याला मारून त्याच्या हातातून ते हिसकावून घेणं हा आक्रमकपणा झाला. मुलं एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे, आपल्या मनासारखी झालीच पाहिजे यासाठी आक्रमक होतात किंवा मग दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी. आक्रमक होण्यामागं अर्थातच राग ही भावना प्रकर्षानं असते. रागाचं निराकरण करणं जमलं नाही, तर त्याचं रूपांतर आक्रमकतेत होतं. मुलांच्या मनात हा राग कुठून येतो?

आक्रमण आक्रमकतेचं या लेखात मीना शिलेदार यांनी यामागची काही महत्त्वाची कारणं दिली आहेत, ती अशी.
    चिंता व भीती या दोन्ही भावनांच्या मिश्रणातून आक्रमकता येऊ शकते.

    विफलता - मुलं वयानुसार वेगवेगळ्या (काही वेळा अगदी छोट्या छोट्या) कारणांनीही नाउमेद होत असतात. एखादी गोष्ट करता येत नाही, जमत नाही म्हणून किंवा मनातलं बोलून दाखवता येत 
नाही म्हणून.

    नाकारलं जाण्याची भावना - पालक मुलांना पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत, तर आपण दुर्लक्षित झाल्याची भावना येते - ती तीव्र झाली तर आक्रमकता वाढते.

    अनुकरण - पालक आक्रमक असतील तर अनुकरणानं मुलंही आक्रमक होतात. वडील व्यसनी असतील, आक्रस्ताळे असतील तर तसंच शाळेतले शिक्षक आक्रमक असल्यास.

    अतिस्वातंत्र्य - लहान भावाला मारणं, वस्तू फेकणं/फोडणं अशा कृतींकडे पालक दुर्लक्ष करत असतील तर.

    कठोर पालक - मुलाला पट्ट्यानं मारणं, चटके देणं अशा शिक्षा मुलांना दिल्या गेल्यास मुलं तशाच प्रकारे इतरांशी वागू शकतात.

    माध्यम प्रभाव - मुलांना दूरदर्शन वा चित्रपटातील दृश्‍यं व खरंखुरं जीवन यामध्ये भेद न करता आल्यानं तीही तसं वागू/बोलू पाहतात.

    असुरक्षितता - लहान भावंड आल्यावर मोठ्याकडं दुर्लक्ष झालं तर ते भावंड एकटं सापडेल तेव्हा तो आक्रमक होऊ शकतो. काही वेळा दुसरं भावंड अधिक हुशार असल्यास ईर्षा उत्पन्न होऊन.

    पालकांचे अतिलाड - अतिलाडामुळं मुलाच्या मागण्या वाढत जातात. नंतर मनाविरुद्ध गोष्ट घडली की मूल आक्रमक होऊ पाहतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today