मुलाला आयफोन देताना...

Iphone
Iphone

बालक-पालक - शिवराज गोर्ले
मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-पालक कराराचा एक आदर्श नमुनाच आहे तो. आई या पत्रात म्हणते, तंत्रज्ञानासह जगताना तू एक जबाबदार युवक होशील, याची आम्हा पालकांवर जबाबदारी आहे; म्हणूनच या काही अटी. याचं पालन तू केलं नाहीस, तर तुझा आयफोन काढून घेण्यात येईल. हा फोन माझा आहे. मी तुला वापरण्यासाठी दिला आहे. मला त्या फोनचा पासवर्ड नेहमी माहीत असेल. माझा फोन वाजला, तर रीसिव्ह कर. मम्मी व डॅडी, असे शब्द स्क्रीनवर दिसले तर टाळू नकोस. रोज शाळेच्या दिवशी साडेसात वाजता तू तो फोन माझ्याकडे देशील.

फोन तुझ्यासोबत शाळेत नेणार नाहीस. शाळेत तू मित्रांशी बोलावंस, मधल्या सुटीत, शाळेनंतर खूप गप्पा माराव्यास, असं मला वाटतं. हा फोन तू कुणाला फसवण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी किंवा मूर्ख बनवण्यासाठी वापरणार नाहीस. तू समोरासमोर जे प्रत्यक्ष बोलू शकणार नाहीस, असं कोणालाही टेक्‍स्ट करू नकोस. त्यांच्या पालकांसमोर जे मोठ्यानं बोलता येणार नाही, असेही ई-मेल किंवा मेसेज तू त्यांना पाठवणार नाहीस. अश्‍लील फोटो, व्हिडिओ तर स्ट्रिक्‍टली नाही.

माझ्याशी बिनधास्तपणे शेअर करू शकशील अशीच माहिती तू इंटरनेटवर शोधशील आणि याबाबत तुझ्या मनात काही द्विधा असेल, तर मला किंवा बाबांना विचारशील.

तू सिनेमा बघत असशील, रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत काही खातपीत असशील किंवा कोणाशी बोलत असशील; तर कृपया तेव्हा फोन बंद ठेव. किमान तो सायलेंट कर. तुझी प्रतिमा उर्मट मुलगा अशी नाहीयं. तुझ्या फोनमुळं तुझं नकारात्मक प्रतिमेत रूपांतर होऊ देऊ नकोस. तू तुझी स्वतःची अथवा इतरांची खासगी स्वरूपाची चित्रं कुणाला पाठवू नकोस. प्रत्येक क्षणी स्वतःचे सेल्फी काढू नकोस. प्रत्येक खासगी गोष्ट सार्वजनिक करण्याची गरज नाही.

जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाचा समरसून आनंद घे. कधीतरी फोन घरी ठेवून बघ. तो तुझ्या सजीव शरीराचा भाग नाही. ते वेगळं आणि अधिक हॅपनिंग असेल. खूप चांगले संगीत या फोनवर तू ऐकू शकतोस. फोनला तुझा विधायक आणि सर्जनशील साथीदार बनव. बुद्धीला आव्हान देणाऱ्या गेम्स खेळ... पण, त्याचवेळी सभोवताली काय घडतंय, याची जाणीव ठेव. त्यासाठी बाळा, डोळे वर आणि नजर समोर ठेव!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com