मुलांचे ‘खेळगडी’ व्हा!

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली मुलं समरहिलमध्ये दाखल झाली. तिथल्या स्वतंत्र वातावरणात स्वतःच्या मर्जीनं शिकती झाली. पुढे जबाबदार नागरिकही झाली. 

‘समरहिल’मध्ये शिकण्याची सक्ती नाही. एक मुलगी तीन वर्ष वर्गात बसलीच नाही. दिवसभर फक्त सायकल फिरवीत असायची. नीलनं तिला एकदाही हटकलं, सुचवलं नाही. एके दिवशी तीच येऊन नीलला म्हणाली, ‘आता मला शिकायचंय!’ नीलनं प्रश्‍न केला, ‘काय शिकायचंय?’ तिनं म्हटलं ‘काय शिकू?’ नीलनं स्पष्ट केलं. ‘ते तू ठरवायचंस.’

गंमत म्हणजे नंतर ती इतकी झपाट्यानं शिकली की तिनं रुढार्थानं ‘वाया घालवलेली’ सर्व वर्ष भरून काढली. 

अशी किमया घडवू शकत असल्यानेच नीलचे विचार संवेदनशीलतेनेच आचरणात आणायला हवेत. त्यासाठी पालकांनी प्रथम स्वतःच्या विचारांचं/वागण्याचं परीक्षण करायला हवं. स्वतःत, स्वतःच्या भूमिकेत बदल करणं आवश्‍यक वाटलं, तर ते बदल नेटानं करायला हवेत. 

होतं काय, जसं आपल्या पालकांनी आपल्याला वागवलं होतं तसंच आपण मुलांना वागवत राहतो. तेव्हा पहिला प्रश्‍न स्वतःला हा विचारायला हवा, आपले पालक योग्य वागवत होते का? ते आपल्याला आवडत होतं का? अनेकदा प्रेमळ पालकही चुकीच्या कल्पनांमुळे अयोग्य वागत असतात.

कडक शिस्तीत मुलांना वाढवत असतात. नील म्हणतो, ‘समस्या मुलांची नसते, समस्या पालकांची असते. ‘प्रॉब्लेम चाइल्ड’ नसतंच, असतो तो ‘प्रॉब्लेम पेरेंट.’ आपली मुलं आपल्या मनातली प्रतिकृती व्हावीत, असा पालकांचा प्रयत्न असतो. स्वतःच अपयश आणि अपुऱ्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा मग स्वतःच्या अपराधीपणाची, द्वेषभावनांची भरपाई करण्यासाठी मुलांचा वापर करून घेतात, ते ‘प्रॉल्बेम पेरेंट’च असतात.’ तुम्ही तसे नसालही, पण नीलचा पहिला प्रश्‍न आहे, ‘मुलांवर कडक शिस्त न लादता, त्यांचे ‘खेळगडी’ व्हायला तुम्ही तयार आहात का?’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com