उत्तम संस्कारांसाठी...

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांवर चांगले संस्कार हे पालकांच्या बोलण्यातून नव्हे, तर वागण्यातून होत असतात, हे आपण पाहिलंच आहे. पण नेमके कोणते संस्कार व्हायला हवेत, याबद्दल पालकांच्या मनात स्पष्टता हवी. त्यासाठी संस्कार म्हणजे काय... खरं तर उत्तम संस्कार कोणते याची नीलनं केलेली व्याख्या अशी - उत्तम संस्कार याचा अर्थ केवळ इतरांचा विचार करणं नव्हे तर इतरांच्या भावना जाणणं. इतरांच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. इतरांना दुखावण्यापासून आपल्याला थांबवतात ते संस्कार. 

नील येथे सिम्पथी म्हणजे सहानुभूतीविषयी नव्हे, तर एम्पथी म्हणजे समानुभूतीविषयी बोलतो आहे. ती असेल तर इतरांशी कसं वागलं - बोललं पाहिजे हे सहज समजून येतं. 

सुसंस्कृत असणं हे अंतिमतः प्रामाणिकपणाशी निगडित असतं. खरे संस्कार हे शिकवता येत नाहीत, असं नील म्हणतो, कारण ते जाणिवेत नव्हे तर नेणिवेत असतात. जे अंतर्मनात खोलवर रुजलेलं असतं, त्यातूनच चांगले संस्कार उमलून येतात किंवा वाईट संस्कार उफाळून येतात. 

मग यावर उपाय काय? 
नील म्हणतो, मुलांना आनंदात राहता येईल असं जग आपण निर्माण केलं तर आपोआपच त्यांच्या मनातली द्वेषाची भावना पूर्ण नाहीशी होईल आणि त्यांच्या वागण्यातून करुणा आणि प्रेम झिरपेल! हे फारच आदर्शवादी वाटतं का? तसं वाटेलही, पण नीलनं ते प्रत्यक्षात आणलं होतं. समरहिल शाळा म्हणजे नीलनं निर्माण केलेलं आणि मुलांना बहाल केलेलं आनंदाचं जगच होतं. नीलनं संस्कार आणि शिष्टाचार यातला फरकही स्पष्ट केला आहे. शिष्टाचार शिकवता येतात, पण तरी तेही शिकवू नये असंच नील सुचवतो.

मुलाला जबरदस्तीनं थॅंक यू म्हणायला लावू नये. कारण शिष्टाचार.... कृत्रिम शिष्टाचार हे संस्कारावरचं आवरण असतं. मुलांना स्वातंत्र्य दिलं तर तेच प्रथम गळून पडतं! गुडी गुडी शिष्टाचारापेक्षा खरंखुरं सौजन्य, सभ्यता मुलांच्या अंगवळणी पडायला हवी, ती स्वातंत्र्याच्या व आनंदी वातावरणातूनच पडू शकते. जगातून ढोंगीपणा आणि दिखाऊपणाचं उच्चाटन करणं हेच चांगल्या संस्कारांचं उद्दिष्ट असतं, असं नील म्हणतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com