शिकण्याची ‘सक्ती’ नसलेली शाळा

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांना स्वातंत्र्य दिलं तर ती चांगली शिकतात, हे खरंच आहे. मात्र, शाळेनं मुलांना स्वातंत्र्य तरी किती द्यावं? म्हणजे त्यांना न शिकण्याचंही स्वातंत्र्य द्यावं काय? 

नीलच्या ‘समरहिल’मध्ये काय केलं जात? 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तिथं ‘तासा’ला बसणं ऐच्छिक आहे. मुलं हवं असल्यास तासाला बसू शकतात किंवा वर्गाबाहेरही राहू शकतात. यावर पहिला प्रश्‍न येतो तो असं किती दिवस चालू शकतं. 

यावर नीलचं उत्तर आहे कितीही दिवस! मुलांची इच्छा असली तर वर्षांनुवर्षे ती वर्गाला/तासाला ‘दांड्या’ मारू शकतात. अशी मुलं शिकतील कशी? इतकं स्वातंत्र्य दिलं तर ती वर्गाला येतीलच कशासाठी? 

प्रत्यक्षात काय होतं? बालवाडीपासून ‘समरहिल’मध्ये येणारी मुलं सुरवातीपासूनच तासाला हजर राहतात. कारण ते तास त्यांच्या वयाप्रमाणं होतात, तर कधी त्यांच्या आवडीप्रमाणं; पंरतु जी मुलं इतर शाळांतून येतात ती या सवलतीचा पुरेपूर फायदा घेतात. खेळत राहतात, सायकलिंग करत राहतात. नील म्हणतो, ‘आधीच्या शाळेनं त्यांच्या निर्माण केलेल्या त्या त्या विषयांबाबतची अप्रीती जेवढी अधिक, तेवढा त्यांना परत मार्गावर आणायला लागणारा वेळ अधिक. सर्वसाधारणपणे अशा मुलांचा हा तासांचा तिटकारा तिनेक महिन्यांत जातो.’ मागे मी हे उदाहरण दिलं होतं. 

एका कॉन्व्हेन्टमधून ‘समरहिल’मध्ये आलेल्या मुलीनं तब्बल तीन वर्षं इकडं तिकडं करण्यात घालवली; पण नंतर ती आली आणि झपाट्यानं शिकली. कारण ‘आता शिकायला हवं,’ हा निर्णय तिनं स्वतः घेतला होता. 

तात्पर्य, स्वातंत्र्य दिलं तर मुलं शिकणारच नाहीत, हा समज चुकीचा आहे. दुसरा मुद्दा येतो मुलांना फक्त स्वातंत्र्य कसं देता येईल, काही शिस्त हवी का नाही? यावर ‘समरहिल’चं उत्तर असं आहे की, कोणत्याच विद्यार्थ्याला तासाला बसण्याची सक्ती नसते; पण एखादा जिमी इंग्लिशच्या तासाला आठवडाभर बसला नाही, तर बाकीची मुलं त्याच्यामुळं अभ्यासक्रम मागे पडतो आहे, म्हणून आक्षेप घेऊ शकतात. वर्गाच्या प्रगतीत अडथळा आणल्याबद्दल त्याला ते वर्गाच्या बाहेरही घालवू शकतात. हीच ती स्वयंशिस्त. तुमच्या स्वातंत्र्याची किंमत तुम्हीच मोजायची असते, इतरांनी नव्हे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com