शोध सर्जनशील शिक्षकांचा...

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
शिक्षण हे जीवनाभिमुख असायला हवं असल्यास ते परिवर्तनशील असायला हवं. कारण, जीवन हे सतत परिवर्तनशील असतं. शिक्षण हे जीवनातील समस्यांना व आव्हानांना तोंड द्यायला समर्थ करणारं हवं. म्हणूनच ते सर्जनशीलतेला वाव देणारंही हवं. 

‘खरं तर सर्जनशीलता ही बीजरूपानं प्रत्येक व्यक्तीत असते,’ असे डॉ. दत्तात्रेय तापकीर ‘अध्यापनाच्या नव्या दिशा, नव्या वाटा’मध्ये म्हणतात, ‘त्या बीजाला अंकुर फुटून ती फुलायला हवी असल्यास त्यासाठी पोषक, प्रोत्साहनपूरक वातावरण हवं. सध्याच्या युगाला ‘माहिती तंत्रज्ञानाचं युग’ म्हणतात. त्यामुळे शिकणं म्हणजे माहिती मिळवणं असं समीकरण दृढ होत आहे. ‘माहितगारानं माहितगार नसलेल्यांना माहिती देत राहणं म्हणजे शिक्षण’ अशा केविलवाण्या अवस्थेत सर्जनशीलता फुलणं शक्‍यच नाही. 

शिकवण्यातून उत्तरं देण्याऐवजी मुलांची उपजत जिज्ञासा, कुतूहल जागृत करायला हवं. रेडिमेड उत्तर देण्याऐवजी मुलांना स्वतःला ‘प्रयोग’ करू द्यायला हवेत. फक्त विज्ञानाच्या प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर प्रत्येक विषयात, प्रत्येक घटकात ही प्रयोगशीलता आणता आली पाहिजे. बोलणं, लिहिणं, चित्र काढणं, गाणं म्हणणं, नृत्य करणं, बागकाम करणं... अशा सर्वच बाबतीत विद्यार्थ्यांना नवीन काही करू देणं, त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणं म्हणजे खरी प्रयोगशीलता होय. विद्यार्थी परीक्षार्थी न होता तो सर्जनशील व्हावा, यासाठी शिक्षक योग्य वातावरण देऊ शकतात. पण त्यासाठी प्रथम ते स्वतः सर्जनशील हवेत. सर्वसामान्य शिक्षक आणि सर्जनशील शिक्षक यांतील फरक स्पष्ट करताना डॉ. तापकीर म्हणतात, ‘औद्योगिक कारखान्यांमध्ये जसे एका छापाचे व साच्याचे उत्पादन केले जाते, तसेच एकाच साच्याचे विद्यार्थी निर्माण करण्यात सामान्य शिक्षक धन्यता पावतो. सर्जनशील शिक्षक मात्र या चौकटीतून बाहेर पडतो. स्वतंत्र होतो. शोधक होतो आणि या शोधक प्रवासात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतो. तो विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानतो व स्वतःला परिघावर ठेवतो. असा शिक्षक ‘बाबा वाक्‍यम्‌ प्रमाणम्’ची अपेक्षा करीत विद्यार्थ्यांवर पांडित्याचा मुलामा चढवीत नाही; तर तो त्यांना संदेह करायला, संशय घ्यायला शिकवतो. प्रश्‍न उभे करायला शिकवतो आणि त्या प्रश्‍नांचा शोध घेण्याच्या अथांग ज्ञानप्रक्रियेत विद्यार्थ्यांबरोबर स्वतःला झोकून देतो.’ 
पालकांनी शोध घ्यायला हवा तो अशा सर्जनशील शिक्षकांचा आणि संधिपूर्ण शाळांचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com