शिक्षण हवं मेंदू अनुसारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
आपण शिकतो कसं, हे आता रहस्य राहिलेलं नाहीयं. शिकण्याचा अवयव असतो मेंदू. या मेंदूमध्ये शिकण्याची प्रक्रिया कशी घडते, याचं ज्ञान फोटो इमेजिंगसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालं आहे. मेंदूत घडणाऱ्या सर्व प्रक्रिया विद्युत वा रासायनिक स्वरूपाच्या असतात; त्यासाठी लागणारी ऊर्जा मेंदू प्राणवायूचा वापर करून मिळवत असतो. मानवी मेंदूत अब्जावधी पेशी असतात. न्यूरॉन या पेशी शिकण्याचं काम करीत असतात, तर ग्लिया पेशी त्यांना मदत करीत असतात. मेंदूकडे जेव्हा नवी माहिती येते, तेव्हा न्यूरॉन्समध्ये विद्युत रासायनिक प्रक्रिया घटते. ज्याला माहिती मिळाली आहे, तो न्यूरॉन ती घेऊन दुसऱ्या पेशीकडे जातो. ती पेशी ती माहिती ग्रहण करते. ही प्रक्रिया मेंदूतील ‘सिनॅप्स’च्या माध्यमातून घडते.

सिनॅप्स तयार झाला म्हणजे शिकण्याची प्रक्रिया घडली. आपलं शिक्षण हे न्यूरॉन्सच्या बांधणीवर व सिनॅक्‍स तयार होण्यावर अवलंबून असतं. मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक सर्वतऱ्हेच्या वाढीचा त्यांच्या मेंदूतील पेशींच्या परस्परबांधणीशी घनिष्ठ संबंध असतो.

चेतापेशी आणि त्यांनी निर्माण केलेली रसायने यांच्यामुळे बाह्य वातावरणातील माहिती मिळणं, तिचा अर्थ लावणं, आकलन व निर्णय प्रक्रिया करून कार्यवाहीची सूचना देणे, माहिती साठवणं व ती आवश्‍यक तेव्हा बाहेर काढणं, अशी बौद्धिक स्तरावरची कामं मेंदूकडे सातत्यानं होत असतात. पंचेंद्रियांतून संवेदनांच्या रूपानं येणारी माहिती प्रथम एकत्रित केली जाते. एकीकरणानंतर ती मनःपटलावर प्रतिमांकित होते. या प्रतिमा पुढे स्मृतिकोषात साठवल्या जातात. मेंदूत घडतं ते हे असं नैसर्गिक शिक्षण.

अर्थात, हे शिक्षण म्हणजे फक्त शालेय विषयाचं नव्हे; संगीत, नृत्य, शिल्प, चित्रकलांचं शिक्षण... खेळांचं शिक्षण हेदेखील न्यूरॉन्समुळेच घडतं. 

मुलांचं शिक्षण अर्थातच असं मेंदूप्रणीत असतं. मुलं आपलं ऐकत नाहीत, असं आपल्याला वाटतं. कारण, मुलं मेंदूचं ऐकत असतात! मेंदूच्या सूचनेनुसार ती वागत असतात व अर्थातच सतत काही ना काही शिकत असतात. 

मुलांच्या शिकण्याची ही मेंदूप्रणीत प्रक्रिया आता पुरेशी उलगडली असल्यानं साहजिकच त्यांना द्यायचं शिक्षण हे मेंदूच्या मर्जीनं व्हायला हवं; पालकांच्या अथवा शिक्षकांच्या मर्जीनं नव्हे! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today