बालकाचं ‘आकलन’ मोजणार कसं?

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
परीक्षेचा राक्षस मुलांना छळतो; भेडसावतो खरा, पण परीक्षा म्हणजे राक्षस कसा? राक्षस पुल्लिंगी तर परीक्षा स्त्रीलिंगी! हे ध्यानात घेऊनच प्रा. मनोहर राईलकर यांनी परीक्षेला पुतनामावशी म्हटलं आहे! 

पण मुलांना खरी छळत असते ती ही पूतनामावशी की जन्मदाती आई? प्रत्येक आईची इच्छा, आपलं मूल वर्गात सर्वांच्या पुढं असलं पाहिजे! आता सगळ्याच आयांची मुलं पहिली कशी येणार? पण आईचं हृदय ते. मुलाच्या (परीक्षेतील सर्वोच्च) उत्कर्षासाठी कळवळणारच ना? मग एखाद्या प्रश्‍नाचं उत्तर लिहायचं राहून गेलं तर ‘जाऊ दे रे, पुढच्या वेळी लक्ष ठेव,’ असं सांत्वनपर थोडंच बोलणार? ती पोराची खरडपट्टीच काढणार! 

खरं तर आपण हे पुनःपुन्हा पाहतो आहोत की, पाठ्यपुस्तक हे शिक्षणाचं एकमेव साधन नव्हे; परीक्षेतून खरी पात्रता कळत नसते. समर हिल शाळेचा संस्थापक नील तर म्हणतो, ‘परीक्षा हा एक शाप आहे, असं मलाच नव्हे आमच्या सर्व शिक्षकांनाही वाटतं. तरीही पालकांनाच परीक्षेचं अप्रूप असतं. आपलं मूल मनापासून शिकतं आहे की नाही, अभ्यास करतंय की नाही, हुशार आहे की नाही, हे सगळं प्रगतिपत्रकातील त्याच्या गुणांवरून कळू शकेल, असं त्यांना वाटतं.’ 

त्यामुळं आठवीपर्यंत परीक्षाच नकोत, हे धोरणही त्यांना मनोमन पटत नाही. आठवीपर्यंतचं सोडा, अगदी लहान मुलांच्या परीक्षा घेऊ नयेत, हे शिक्षण अधिनियमातच आहे. तरीही शाळासुद्धा (या ना त्या मिषानं) बालकांवर परीक्षा लादत असतात. या संदर्भात वनिता कौल म्हणतात, ‘पालकांनी एकदा हे पक्कं समजून घेतलं पाहिजे की, इतक्‍या लहान वयातील बालकांची बौद्धिक क्षमता मोजण्याची कोणतीही कसोटी संपूर्ण जगात अजूनतरी सापडलेली नाही. परीक्षांमधून नेमकं काय साधतं? मिळालेले गुण हे बालकाच्या आकलनाचे, म्हणजे त्याला तो विषय कितपत समजला आहे याचे किंवा त्याच्या बुद्धिमत्तेचे निदर्शक थोडेच असतात? ते असलंच तर धोका आणि ओका या पद्धतीच्या यशांचं मोजमाप असतं, आकलनाचं नव्हेच. बालकांच्या आकलनाचं आकड्यांमध्ये निदान करताच येत नसतं. निरीक्षणातून त्याच्या प्रगतीचा अदमासच घेता येतो, हेच खरं वास्तव आहे!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com