शिक्षणात काय अभिप्रेत आहे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्फोट झालेल्या वातावरणात सर्व जगातच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या वातावरणात जन्मलेल्या मुलांना तंत्रज्ञानाचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं व ते आत्मसात करणंही जमू लागलं आहे. या ग्लोबल वातावरणात नुसत्या वाचलेल्या माहितीचं महत्त्व राहिलं नाही. स्वतःच्या मतांना, तसंच अनुभवानं मिळालेल्या, स्वहस्ते कृतीतून संपादन केलेल्या ज्ञानाला असाधारण महत्त्व प्राप्त झालं. 

अशा परिस्थितीत आपल्या शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणला नाही तर; अनेक प्रश्‍न निर्माण होतील, हे ओळखून आपल्याकडील विचारवंतांनी नवविचाराला व बालशिक्षण चळवळीला प्रारंभ केला. अर्थात, शासनालाही या विचारांची दखल घ्यावी लागली. राष्ट्रीय शिक्षण आराखडा जाहीर होऊन भावी शिक्षणाचे उद्दिष्ट व त्यायोग्य दिशा ठरवली गेली. त्यानुसार शिक्षणाचे पारंपरिक निकष आता कालबाह्य ठरले आहेत. आताचे निकष आहेत ते असे... 

     विद्यार्थी परीक्षेतल्या प्रश्‍नांची उत्तरं देतो का यापेक्षाही तो स्वतः चौकस बुद्धीनं कळीचे प्रश्‍न उपस्थित करू शकतो का? 

     तो आपल्या माहितीचं व ज्ञानाचं उपयोजन वेगळ्या परिस्थितीतही समस्या सोडविण्यासाठी करू शकतो का? 

     स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता त्याच्यात आहे का? 

     स्वहस्ते कृती करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो स्वतः संशोधनात्मक निष्कर्षाप्रत येऊ शकतो का? 

हे सारं आता नव्या शिक्षणात अभिप्रेत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेले विविध उपक्रम, स्वतः आत्मसात केलेल्या क्षमता, कला, सर्जनशीलता, नवनिर्मिती या गोष्टींना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. अर्थात, विद्यार्थ्यांनी एखादे जीवनोपयोगी कौशल्यही आत्मसात करावे, असा प्रयत्न असणार आहे. ही असणार आहे नवविचारांच्या ज्ञानरचनावादी शिक्षणाची दिशा. पालकांनाही ती समजून घ्यावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today