भाषा शिक्षणाची सहा क्षेत्रे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
आपली मुलं आता कशी शिकणार आहेत, त्यांनी कसं शिकणं अपेक्षित आहे, हे पालकांनी माहिती करून घ्यायला हवं. राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार भाषा, अध्ययनाची सहा क्षेत्रे ठरविली गेली आहेत. 
१)     घरातील व परिसरातील भाषिक शिक्षण : मुलं शाळेत येण्यापूर्वीपासूनच वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर होणाऱ्या भाषिक देवाण-घेवाणीतून भाषा शिकत असतात. फक्त त्यांच्याशीच नव्हे, तर इतरांच्या आपापसांत होणाऱ्या संवादातूनही त्यांच्या कानांवर अनेक गोष्टी पडत असतात. शाळेत आल्यावर त्यांना जे नवे अनुभव मिळतात, ज्या नव्या गोष्टी माहिती होतात, त्या घरच्या माणसांना त्यांना सांगायच्या असतात. मोठ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिला तर मुलं व्यक्त होत राहतात. शाळा व घर यातील आंतरक्रिया व सामंजस्य वाढून मुलांचा विकास होत जातो. 
२)     वर्ग, शाळा व समाजात होणाऱ्या भाषिक आंतरक्रिया  : शाळेतील सर्वांशी होणाऱ्या भाषिक आंतरक्रिया, शाळेबाहेरील व्यावसायिक आदी व्यक्तींशी येणारा संबंध, माध्यमातून होणारा अन्य भाषांचा परिचय... त्या भाषांचा आदर राखत प्रमाणभाषेचे अनुभव या क्षेत्रात विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. 
३)     भाषेच्या नियमांचा परिचय  : घरात आणि समाजात भाषा अनौपचारिकपणे शिकतानाच मुलांच्या अंतर्मनात त्या भाषेच्या नियम/ व्याकरण व्यवस्थेचे आकलन अबोध अवस्थेत सुरू असते. तिला हळूहळू (पडताळा पाहत) बोधावस्थेत आणण्याचे काम पाचवीनंतर सुरू होते. आठवीत ती भाषा आकर्षक, सुंदर व प्रभावी बनविण्याचं शिक्षण सुरू होतं. 
४) परिसर अभ्यासाशी जुळणी : मुलांनी आपल्या परिसरात जे पाहिलं, जी माहिती झाली, ती शिक्षकांना, मित्रांना सांगण्यातून भूगोल, नागरिकशास्त्र... अशा अन्य विषयांशी भाषेची एकात्मता साधण्याचा प्रयत्न करणे. 
५) साहित्यिक रचनांचा आस्वाद : विविध साहित्य प्रकार जाणणे, त्यावर चर्चा करणे व आस्वाद घेणे. 
६) स्वतः अभिव्यक्त होणे : फक्त निबंधलेखनच नव्हे तर जे वाटले, तसं आपणही लिहावं असं मुलांना वाटत असतं. या नैसर्गिक ऊर्मीला पालक, शिक्षकांनी प्रोत्साहन द्यायला हवं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today