मुलांना वर्गाच्या भिंती वापरू द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांना शिकतं करणाऱ्या, आनंदी करणाऱ्या रचनावादी शाळा पालकांनी ओळखायला हव्यात. काय नेमके बदल होत असतात, अपेक्षित असतात, या नव्या, शास्त्रीय शिक्षणप्रणालीनं? 

शिक्षण हक्क कायद्यांत म्हटलं आहे, ‘विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा रितीनं वर्गांमधल्या अनुभवांची मांडणी व्हायची असेल तर, शालेय व्यवस्थेत अंगभूत स्वरूपाचे मोठे बदल करावे लागतील.’ 
एकेक मुद्दा लक्षात घ्या - विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फक्‍त शिकता यायला नव्हे, ज्ञानाची निर्मिती करता यायला हवी. त्यासाठी अनुकूल अशी वर्गांमधल्या (शिकवण्याची नव्हे) अनुभवांची मांडणी व्हायला हवी. 
त्यासाठी मोठे बदल कोणते व्हायला हवेत? 

ते व्हायला हवेत - वर्गाच्या, शाळेच्या रचनेत, 
- वर्गातल्या शिक्षणप्रक्रियेत 
आणि शिक्षक/ शिक्षिकांच्या मनानं! 
आता एक एक घटक समजून घेऊ. प्रथम ‘वर्गवातावरण!’ शाळेत फक्त ‘फळा’ वापरून शिकवायचं असतं, हा समज जुना झाला. शाळेतल्या जमिनी हासुद्धा एरव्ही शिकवण्याच्या प्रक्रियेत न वापरला जाणारा घटक आता शाळा वापरू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये जमिनी या शैक्षणिक अंगांनी रंगवल्या आहेत. विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून खेळता येतील असे खेळ, काही उपक्रम सुरू झाले आहेत. 

जमिनीचा आणि वर्गांच्या/शाळेच्या भिंतींचाही अभिव्यक्तीसाठी वापर ‘नवशिक्षणपद्धती’त अभिप्रेत असतो. रचनावादी शिक्षण पद्धती या संदर्भात काय सुचवते. या पद्धतीनुसार जमिनीवर, भिंतीवर कोणत्याही गोष्टी असू नये. शाळांच्या भिंतीवर टांगलेले फोटो शक्‍य तेवढे काढून टाकले तर मुलांना त्या अभिव्यक्तीसाठी वापरता येतील. भिंती हा वर्ग वातावरणाचा भाग असतो, त्यामुळं वर्गाच्या शैक्षणिक वातावरणात भिंतींना सामावून घेणं अपेक्षित असतं; तसंच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी भिंतही एक सोईस्कर जागा असते आणि भिंतीवरचं आपल्या कामाचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणारं असतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today