शाळेत हवीत मुबलक शैक्षणिक साधनं!

School
School

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
प्राथमिक शाळांमध्ये बाकं कशासाठी हवीत? बाकांमुळे इतकी जागा अडते, की मुलांना मुक्तपणे हालचाली करता येत नाहीत. हे एकतर अजूनही काही ‘विद्वान’ मंडळींना कळत नाहीय किंवा कळत असलं तरी वळत नाहीय. 

शासकीय प्राथमिक शाळांमध्ये मात्र वर्गातल्या बाकांना रजा देऊन मुलांना जमिनीवर छोट्या शाळांमध्ये बसवलं जातं आहे. खासगी मराठी अथवा इंग्रजी शाळांमध्ये मुलांना बाकांवर न बसवता जमिनीवर बसवायला सुरवात केल्यास ते पालकांनाच ‘पचणार’ नाही. तो त्यांच्या प्रतिमेला धक्काच असेल! मुलांच्या नैसर्गिक शिक्षणापेक्षा पालकांची तथाकथित प्रतिष्ठा महत्त्वाची! गट पद्धतीत मुलं अधिक चांगलं शिकतात. फक्त हे गट अध्ययनाच्या हेतूंनुसार असावे लागतात आणि ते अनेक कारणांनी बदलतही जात असतात. 

आणखी अपेक्षित व चांगला बदल म्हणजे शाळांतून शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. काही साधनं शासनानं पुरवलेली, काही शाळांनी विकत घेतलेली, तर काही शिक्षकांनी स्वतः केलेली आहेत. यातली काही साधनं नित्याची असली, सर्वत्र वापरातली असली तरी काही साधनं शिक्षकांनी आपल्या कल्पकतेनं नव्यानं निर्माण केलेली आहेत. शिक्षकांच्या शिक्षणप्रक्रियेतील उत्साही सहभागाचं हे बोलकं उदाहरण तर ठरतंच, पण अशा कल्पक शिक्षकांच्या सहवास, मार्गदर्शनानं आपली मुलंही पठडीबाहेरचं शिक्षण घेऊ शकतील, स्वतः कल्पक, सर्जनशील होऊ शकतील अशी अपेक्षा पालक करू शकतात. 

अर्थात, शैक्षणिक साधनांची ‘शास्त्रीयता’ महत्त्वाची असते, ती असते त्यांच्या हेतूपूर्ण वापरात आणि हेतूपूर्ण विद्यार्थी-प्रतिसादात. साधनाकरवी जे घडवायचं, ते नेमकं व स्पष्ट असलं पाहिजे आणि तसं त्यातून अंतिमतः घडलंही पाहिजे. साधनं वयानुरूप, शिकण्याच्या घटकांनुरूप हवीत, तशीच ती विद्यार्थ्यांना आवाहनरूप, अशीही असायला हवीत. तुम्ही मुलांना ज्या शाळेत पाठवू इच्छिता, तिथल्या शिक्षक वर्गाला नवशिक्षणातील या प्राथमिक तत्त्वांचे तरी ज्ञान आहे का, हा प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com