‘शिकणं’ फक्त वर्गात होत नसतं!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलं चांगली शिकली पाहिजेत ही मुख्यतः शिक्षकांची आणि पालकांची जबाबदारी असली, तरी शासनही त्यात फार मोठं योगदान देऊ शकतं. आनंदाची बाब ही की, आज शासनही मुलांच्या शिक्षणप्रक्रियेबद्दल अधिक सजग होताना दिसत आहे. 

प्रा. रमेश पानसे म्हणतात त्या प्रमाणे, ‘शासनानं क्रमाक्रमानं दरवर्षी क्रमिक पुस्तकं नव्यानं तयार केली, त्यात एक वैचारिक प्रवाहीपणा दिसून येतो आहे. क्रमिक पुस्तकांचं स्वरूप अधिकाधिक ‘रचनावादी’ शिक्षणाच्या अंगानं बदललं जात आहे. विशेषतः सहावीची पुस्तकं याच मालिकेत पुढचं पाऊल टाकणारी आहेत. या पुस्तकांमधून विषयांमधल्या घटकांना भिडणारे पाठ तर आहेतच; परंतु मुलांना केवळ पाठातच गुंतवून न ठेवता, त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कृतींकडं वळवण्याचा आणि त्याकरवी वर्गाबाहेरच्या सामाजिक जीवनाशी जोडण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुलांच्या शिकण्यासाठीचा परिसर वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता, त्याच अंगणाचं विस्तारलं आहे. मुलांचं शिक्षण केवळ वर्गांमधून न होता ते आता काही प्रमाणात बाह्य जीवनव्यवहारातून व्हावं, असा प्रयत्न यात करण्यात आला आहे. हे रचनात्मक शिक्षणाचं पडलेलं पुढचं पाऊल आहे.’ 

आजवरचं शालेय शिक्षण नैतिक आणि नागरिकत्वाच्या मूल्यांबाबत उदासीन होतं. ही शालेय शिक्षणामधील फार मोठी उणीव होती. शेवटी प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असतो, तो फक्त डॉक्‍टर, इंजिनिअर, सीए नसतो! उद्याचे चांगले नागरिक घडवणं हीसुद्धा शालेय शिक्षणातूनच अपेक्षित प्रक्रिया असते, पण या संदर्भात फक्त चर्चा होत होती. प्रत्यक्षात काही घडत नव्हतं. मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांच्यामध्ये चांगली मूल्यं रुजवणं, त्यांना उत्तम नागरिक बनवणं, ही जबाबदारी पालकांची आणि बाहेरील समाजाची मानली गेली होती. पण आता शिक्षणात, त्याचा आधार असलेल्या क्रमिक पुस्तकांतही बदल होतो आहे. आता शाळांमधल्या विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्याची जोड दिली जाते आहे. भाषांच्या पुस्तकांमधून हे अगदी ठळकपणे प्रत्ययाला येत आहे? 

पालकांनीही या बदलाचं स्वागत करायला हवं, त्या प्रक्रियेत उत्साहानं सहभागी व्हायला हवं. त्यातून सर्व मुलं आनंदानं, स्वयंप्रेरणेनं शिकतील आणि उद्याचे चांगले नागरिक म्हणूनही घडतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today