आनंददायी व्यावसायिक नगरी

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
नाशिकच्या रचना बालवाडीच्या मोठ्या गटात कोण काय करतो? हा पाठ सुरू होता. चर्मकार, कुंभार, शिंपी, गवंडी, सुतार... चित्रांवरून व सहज मिळतील अशी त्यांची साधनंही जमवलेली होती. मुलांच्या त्या संदर्भातला उत्साह पाहून स्वाती गद्रे यांच्या मनात विचार चमकून गेला. दरवर्षी शाळेत काही ना काही वेगळं करू या, असा प्रयत्न असतो. या वर्षी या व्यावसायिकांनाच का बोलावू नये? त्या विचारातूनच त्या वर्षी शाळेतच उभारली गेली.... व्यावसायिक नगरी. एकविसावे शतक तंत्रज्ञानाचं युग आहे.

शहरी भागातून पूर्वापार व्यावसायिक थोडे बाजूला टाकल्यासारखे झाले आहेत... मग ठरलं १० ते १२ व्यावसायिक बोलवायचे, त्यांच्या कृती साहित्यांचा तक्ता करायचा... मंडप घालायचं, लोकांचाही सहभाग मिळवायचा... अन्य शाळांतील मुलामुलींना व शिक्षकांनाही बोलवायचं...

लोहार, सुतार, सोनार, चर्मकार, कुंभार, बुरूड, भडभुंजे, फुलमाळी, कल्हईवाला... असे आपल्या साहित्यासह मुलांना प्रत्यक्ष कृती अनुभव देण्यासाठी सकाळीच दाखल झाले... आपापली कला मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं सादर करत गेले. मुलांच्या कुतूहलाला तर उधाणच आलं होतं. या फुलांना गेलाड, निशिगंध म्हणतात होय? मावशी तुम्ही मशीनचं चाक फिरवता तेव्हाच कापडही पुढे नेता आणि पायही चालवता कसं काय जमतं हो? आजी तुम्ही किती पटापट टोपली विणता! हे कसं विणायचं तुम्हाला कुणी शिकवलं? अय्या, अशी करतात कल्हई..... इ. इ. सर्वांत डिमांडमध्ये होते कुंभार काका. सर्वांनी मातीत हात घातले. कुणी पणत्या केल्या... कुणी बोळकी केली. कुंभारकाका - आम्हाला पण शिकवा ना! असं मुलं म्हणत होती. कुंभारकाका शिकवताना सांगत होते, मुलांनो मनापासून मातीला हात लावा. तुम्हालाही हे जमू शकेल. मन जिथं असेल ते सर्व तुम्हाला जमेल! हेच तर शिकणं नसतं का? ना उसंत... ना कंटाळा. त्या दिवशी मुलांना खायची - प्यायचीही शुद्ध राहिली नाही. फलटणच्या कमला निंबकर बालभवनानं केलेला असाच एक प्रयोग. मुलांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता यावा म्हणून शाळेतल्या बागेचे रूपांतर खेड्यात करण्यात आलं. गवताच्या झोपड्या उभारण्यात आल्या. पालकांसह मुलं एक रात्री त्या खेड्यात राहिली. चुलीवरचं भाकरी - भाजी हा स्वयंपाक केला गेला. मुलांच्या उत्साहाला अन्‌ आनंदाला अक्षरशः पारावर राहिला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com