स्वयंशिक्षणासाठी प्रकल्प पद्धती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांनी स्वतः होऊन आनंदानं शिकावं यासाठी आता शिक्षणात प्रकल्प पद्धती वापरली जाते. मुलांच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची असणारी भाषा व तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती करण्याची संधी देण्यासाठी प्रकल्प ही सर्वांत प्रभावी पद्धत आहे. मुलांना वेगवेगळ्या विषयांतर्गत प्रकल्प देता येतात. प्रकल्प ही एका अर्थी नवनिर्मिती असते. प्रकल्प मुलांनी स्वतः करायचा असतो. पालकांना/शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करायचं असतं. मात्र ते करताना सजावट करण्यात मदत किंवा हस्तक्षेप करायचा नसतो. 

प्रकल्प कशासाठी? प्रकल्पाचे हेतू कोणते?  
  शिक्षण्याबद्दलचा मुलांचा कंटाळा घालवणे. 
  मुलांना कृतीतून अनुभव देणे. 
  चित्त एकाग्र करण्यास, रंगून जाण्यास मदत करणे. 
  मुलांची नैसर्गिक क्षमता वाढवणे. 
  त्यांची शोधककृती जागी करणे. 
  रंजनातून खरेखुरे ज्ञान देणे. 
प्रकल्पातून भाषिक जडणघडण होते, स्वतःला व्यक्त करता येणं, स्वतःच्या कल्पनांशी संवाद करता येणं, अनुभवाच्या आकाशात विहार करता येणं या गोष्टी सहजसाध्य होतात. 

प्रकल्प पद्धतीचा उगम बाल्यातच असतो. बालवयात आपण कितीतरी वेगवेगळे छंद जोपासत असतो. पिसं, बांगड्यांच्या काचा, बिया, मणी जमवणं, पिंपळाची पानं पुस्तकात ठेवून त्यांना जाळी पाडणं, लग्नपत्रिकांवरील चित्रं कापणं, रंगीत दगड जमवणं, त्यातून छोट्या छोट्या वस्तू, फ्रेम बनवणं हे करतच असतो. या साऱ्यात शोधकवृत्ती, निरीक्षणक्षमता, कल्पकता असते. याच गुणांचा उपयोग प्रकल्पांसाठी करून घ्यायचा असतो. पालक/शिक्षकांकडं ती वृत्ती, त्या क्षमता असायला हव्यात. चाकोरीबद्ध अभ्यास पद्धतीतून मुलांना बाहेरचं जग अनुभवू देण्याची, स्वतःचं निरीक्षण करून मतं मांडण्याची, स्वतःच्या हातांनी कृती करून अनुभव घेण्याची संधी अशा प्रकल्पांमधून मिळते. उत्सुक, उत्साही, सुजाण पालकांसाठी रेणू दांडेकर यांनी ‘निर्मितीचं अवकाश’ या पुस्तकामध्ये अशा २०० हून अधिक प्रकल्पांची माहिती त्यांची रचना, मांडणी, मूल्यमापन कसं करावं, प्रकल्पाचं सादरीकरण कसं करावं, याचं मार्गदर्शन केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today