आम्हीही रचतो गाणी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
कोल्हापूरच्या ‘सृजन-आनंद विद्यालयात’ मुलं फक्त क्रमिक पुस्तकातली गाणी पाठ करत नाहीत. त्या गाण्यांच्या चालीवर व तालात स्वतःही रचना करतात. चालीत, तालात ओळ बनण्यासाठी शब्द शोधण्याची धडपड करावी लागते. यमक जुळावं लागतं. त्यातून मजेशीर रचना तयार होते. जी सहज ओठांवर खेळते. मुलांना स्वतः ‘कवी’ झाल्याचा आनंद तर मिळतोच, पण भाषेच्या शब्दांचा लळा लागतो. त्यांचं शब्दभांडार समृद्ध होतं. 

‘अखंड’ या जोतिबांच्या अभंगरचनेला मुलांनी केलेली समांतर रचना... 
एक आभाळ सर्वां, चंद्र तारे देते। 
डोळां सुख वाटे, पाहताना। 
एक आई सर्वां, प्रेम हे देते। 
चांगले बनविते, बाळाला त्या। 
अशी चांगली पंधरा कडवी मुलांनी रचली होती. 
शेवटी ‘ळी’ येणाऱ्या शब्दांच्या मदतीनं मुलांनी केलेली ही मजेशीर रचना 
एक होती चवळी, ती होती काळी 
तिला आवडते पोळी, पोळी खाऊन झाली ढोबळी 
ढोबळी झाली बावळी, तिला आवडे साखळी 
चवळीला भेटला कोळी, म्हणाला 
चवळी गंचवळी, कुठाय तुझी कवळी? 
आवरून आठवलं - मंगेश पाडगावकरांनी टीव्हीवर ही बालकविता वाचली होती. एक होता काऊ, तो चिऊला म्हणाला, 
मला घाल न्हाऊ 
एक होती घूस, ती चिऊला म्हणाली 
माझं अंग पूस 
एक होता पोपट, तो चिऊला म्हणाला, 
मला जरा थोपट 
एक होतं कासव, ते चिऊला म्हणालं, 
मला चड्डी नेसव. 
याचं प्रक्षेपण झाल्यावर त्यांना त्यांच्या मित्राच्या नातवानं फोन केला. तो म्हणाला, ‘आजोबा, मी पण कविता केलीय, 
एक होता बैल, तो चिऊला म्हणाला 
माझी चड्डी झाली सैल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today