शाळा नको, घरातच शिका!

Education
Education

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
महाराष्ट्र सरकारनं ‘ओपन एसएससी’ बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण प्रवाहातून दूर, शारीरिक अक्षम, विविध कौशल्यात करिअर करणारे विद्यार्थी थेट दहावीची परीक्षा देऊ शकतील. शाळेत दाखल झालंच पाहिजे अशी आता सक्ती नसेल. 

जे पालक आपल्या मुलांना खर्चीक शाळेत पाठवू शकतात, पण त्यांना पाठवायचं नाहीये, कारण मुलांनी कसं शिकावं या विषयीचे त्यांचे विचार वेगळे आहेत, शिक्षणाकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत, त्यांना हा पर्याय स्वागतार्हच वाटेल. मुलांना अनेक गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत, पण शाळेत गेल्यानं कराव्या लागतात, त्याचं ओझं वाटतं, मुलं कंटाळतात त्यातून मुलांना सोडवण्याचा पर्याय म्हणजे होम स्कूलिंग... गृहशिक्षण. 

प्रचलित शिक्षण प्रवाहाला कारखानदारी रूप असतं म्हणून त्याला फॅक्‍टरी स्कूलिंग म्हटलं जातं. अनेक सर्जनशील मनांना ते नको वाटतं. जगभरात अनेक प्रगत देशांत मुक्त शिक्षण, गृहशिक्षण हे पर्याय काही वर्षांपासून प्रचलित आहेत. अर्थात, तिथंसुद्धा हे पर्याय स्वीकारणारे पालक फार तर दोन ते तीन टक्के आहेत. औपचारिक किंवा सरकारी शाळांकडंच बहुसंख्यांचा कल असतो. मुलांच्या सामाजिकीकरणासाठी औपचारिक शाळा सर्वोत्तम मानल्या जातात. 

तरीही, आज भारतातही जवळपास दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी हा पर्याय अगोदरच निवडलेला आहे व ते एकमेकांशी जोडलेले आहेत. या संदर्भात रेणू दांडेकर म्हणतात, ‘माझ्या परिचयातल्या काही कुटुंबांनी हा पर्याय स्वीकारला. त्यातील मुलांना कितीतरी गोष्टी करता येत आहेत, मुलं आनंदात आहेत. पुढं ती मुलं विचार करू लागल्यावर त्यांनी त्यांचा पुढचा मार्ग निवडावा, हे स्वातंत्र्यही दिलं आहे. मात्र, ही संकल्पना सोपी नाही.

मुख्य म्हणजे, पालकांना यासाठी वेळ असावा लागतो. अप्रत्यक्ष का होईना मुलांच्या घरच्या वेळेचं नियोजन करणं, त्यांची आवड, छंद, कलकौशल्य समजून तसं पर्यावरण निर्माण करताना सामाजिकताही त्यांना देणं या गोष्टींचं भान ठेवावं लागतं. मुलांमध्ये प्रचंड क्षमता असतातच, मात्र अंतिमतः काय करायचंय ते मी करेनच हे ठामपणे ठरवण्याचं धाडस कमी मुलांमध्ये असते. पालकही पाल्याचं भविष्य आपणच ठरवण्यात कृतार्थता मानत असतात. ही मानसिकता बदलता आल्यास मुलांमधल्या कौशल्यांना, गुणांना संधी देणारा हा पर्याय आता उपलब्ध आहे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com