काळाच्या पुढची ‘नई तालीम’

Education
Education

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘हस्तोद्योगातून मुलं गणित, विज्ञानही शिकतील’ ही गांधीजींची केवळ एक ‘लहर’ नव्हती. ते त्यांचं ‘द्रष्टेपण’ होतं. त्यांची ‘नई तालीम’ ही संकल्पना कालबाह्य झालेली नाही, उलट तीच आज काळाची गरज असल्याचं शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनाही जाणवलं आहे. वर्धा येथे ‘आनंदनिकेतन’ नव्यानं सुरू झाली आहे. काय वैशिष्ट्यं आहेत या ‘नई तालीम’ शाळेची? 

   प्रीती, मुक्ती आणि अभिव्यक्ती या आधारावर इथले शिक्षण व विद्यार्थी यांच्यातील संबंध जोपासले जातात. 

   इयत्ता सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बागकाम व शेती हा विषय आहे. मुलं विविध भाज्या, कापूस, मूग, तूर, ज्वारी, बाजरी, मका यांची पावसाळी लागवड तर मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या हिवाळी भाज्यांची लागवड व देखभाल शिकतात. यातूनच जमिनीचं मोजमाप व परिमिती काढणं, स्केलनुसार बागेचा नकाशा काढणं, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करत बागेची रचना करणं मुलं शिकतात. विविध ऋतूमधलं किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतल्या पाण्याची पातळी या साऱ्यांचं मोजमाप, नोंदी व आलेख काढणं शिकता येतं. खतं, कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करणं, मधमाशा, कीटकांचं निसर्गातलं महत्त्व जाणून घेतलं जातं. अळिंबाची शेतीही मुलं शिकतात. 

   भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिकशास्त्र या विषयांच्या अध्ययनासह इथली मुलं वस्त्रं विणतात, वस्त्रकल शिकतात. 

   महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची संधी प्रत्येक मुलाला मिळते. ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचं शास्त्र, मुलं शिकतात. त्यातूनच स्वावलंबन व लिंग समभाव रुजतो. 

   कला व संगीत यातून मुलांमध्ये सर्जनशीलता व सौंदर्यदृष्टी रुजवली जाते. अभिरुची जोपासली जाते. 

   मुलांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेला व सामाजिक जाणिवेला चालना देण्यासाठी सामाजिक विषयांवर सतत संवाद, परिसंवाद होत असतात. समाज दर्शनाच्या क्षेत्रभेटी योजल्या जातात. या ‘नई तालीम’ मधून सुशिक्षित बेकारांची फौज निर्माण कशी होईल? ही ‘नई तालीम’ ज्ञानरचनावादाशी जुळणारी, परिसर पर्यावरणाशी मुलांना जोडणारी, विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागानं त्यांच्यात जीवनकौशल्यं विकसित करणारी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारी आहे. 
खऱ्या ‘शिक्षणा’तून आणखी काय अपेक्षित असतं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com