जेव्हा ‘धड्यां’चे होते बाहुली नाट्य...

Bahuli-Natya
Bahuli-Natya

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलं आनंदानं शिकली पाहिजेत. खेळणं ही त्यांची सहजप्रवृत्ती असते, तसेच शिकणं हीसुद्धा त्यांची सहजप्रवृत्ती व्हायला हवी. तशी ती होऊ शकेल? निश्‍चित होऊ शकेल. ती जबाबदारी मुलांची नव्हे. शिक्षकांची आहे; त्यांच्यासाठी शाळा निवडणाऱ्या पालकांची आहे. के. सी. बेबीकुट्टी यांच्यासारखे सर्जनशील शिक्षक असेल तर शिकणंही सहज सुंदर होऊ शकतं, बोलकं होऊ शकतं! बी. एड. बरोबरच कला शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून बेबीकुट्टी यांनी केरळमधील ‘श्रमजीवी भारत गुरुकुलम’ शाळेत अध्यापन सुरू केलं. त्यांचा एकच ध्यास होता शिकणं रंजक व सुलभ झालं पाहिजे. मुलांचा त्यात सक्रिय सहभाग असला पाहिजे. यासाठी त्यांनी स्वतःच सुरू केले, चार अभिनव उपक्रम. या कामी त्यांच्यातील ‘कलाकार’ मदतीस धावून आला. 

धड्यांचं नाट्य रूपांतर - सर्वप्रथम ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील एखादा धडा लक्षपूर्वक वाचायला लावायचे. त्यानंतर त्या धड्यावर आधारित संवाद लिहायला सांगायचे. त्या धड्याचं नाट्य रूपांतर कसं करावं, याची तयारी करवून घ्यायचे. 

बोटांवरील बाहुली नाट्य - मुलांनी त्यांच्या कुवतीनुसार धड्याचं नाट्यरूपांतर केल्यानंतर, बोटांवर बाहुल्यांचे चेहरे रंगवून मुलांना बाहुलीनाट्य सादर करण्यासाठी बेबीकुट्टी बारकाईनं मार्गदर्शन करायचे. बाहुली नाट्यातून धड्यातील नाट्यरूपांतरीत पात्रांचे संवाद म्हणताना मुलांना धमाल येत असे. 

प्रत्यक्ष बाहुली नाट्याची रंगरंगोटी - बोटांवरील बाहुली नाट्याची प्राथमिक ओळख झाल्यानंतर मग तयारी पात्रांच्या बाहुल्या रंगवण्याची व नटवण्याची. बाहुल्या रंगवताना, त्यांना रंगीबेरंगी कपडे नेसवताना मुलांच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः उधाण यायचं. कपडे, रंगसंगती याबद्दल बेबीकुट्टी मार्गदर्शन करायचे. 

बाहुली नाट्याचे सादरीकरण - वरील प्रकारे सर्व तयारी पूर्ण झाली की मुलं वर्गात आणि शाळेच्या सभागृहात बाहुलीनाट्य प्रत्यक्ष सादरही करायची. या असल्या धमाल उपक्रमामुळे मुलामुलींना धड्याचं उत्तम आकलन तर व्हायचंच, पण धड्यातील बारीकसारीक तपशील, नवे शब्द, नव्या संकल्पना समजू लागल्या. मग काय.. एकामागून एक धडे नाट्यरूपांतरीत होऊ लागले. नाटक, संगीत, नृत्य मुलांच्या अंगात भिनू लागले, हसत खेळत नाचत शिक्षण होऊ लागलं. मुलांची अभिव्यक्ती करण्याची क्षमता द्विगुणित झाली. चिमुकल्या हातांनी शैक्षणिक साधनांची निर्मिती होऊ लागली. विषयासाठी मुलांकडूनच साधनं तयार होऊ लागली. ती देखील नारळाच्या करवंट्या, शिंपले, काड्यापेट्या अशा वस्तूंच्या वापरातून. शिक्षकांची सर्जनशीलता मुलांमध्ये आपसुकच झिरपू लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com