Education
Education

चौकटीत राहून चौकटीबाहेरचे शिक्षण

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘अक्षरनंदन’ या पुण्यातील प्रयोगशील शाळेची सुरवात १९९२ मध्ये झाली. ‘घोका, ओका, ठोका’ या प्रणालीला नाकारून शिकणं ही एक सहज, आनंददायी प्रक्रिया ठरवी, यासाठी शाळेने मराठी माध्यमाची निवड केली.

मुलांमधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता जोपासण्यासाठी शिक्षण कोणत्याही स्पर्धात्मक प्रलोभनांपासून दूर ठेवलं. माध्यम मराठी असलं तरी शाळेची प्रार्थना, स्नेहसंमेलन व इतर अनेक उपक्रमांतून मराठीच्या बोली व इतर भाषांचीही मुलांना ओळख करून दिली जाते. 

‘हुशार’ व ‘ढ’ अशा शिक्‍यांऐवजी मुलांची बलस्थानं, आवडीनिवडी, विविध विषयांतील रस, समाजाचा उपयोगी हिस्सा म्हणून वावरताना आवश्‍यक ती कौशल्यं, त्यांची तपशीलवार व बारकाईनं नोंद घेतली जाते. प्रत्येक मुलांमधील वेगळेपण स्वीकारणं, योग्य ठिकाणी आधार देत आकार देणं आणि त्याचं आत्मभान तसंच आत्मविश्‍वास वाढवणं इकडे शाळेचं लक्ष असतं. येथे शिक्षक स्वतःही सतत शिकत असतात. सतत प्रयोगशील राहून, नावीन्यपूर्ण पद्धतीने मुलांना सामावून घेत शिक्षण दिलं जातं. मुलांना निर्भयपणे शंका विचारता येतात, त्यांचा सूचनांचा गंभीरपणे विचार केला जातो. लादलेल्या शिस्तीपेक्षा स्वयंप्रेरणेनं येणाऱ्या नियमनावर शाळेचा भर असतो. 

सर्वसमावेशकता हे तर शाळेचं खास वैशिष्ट्य. शाळा सर्व स्तरांतील मुलांना एकत्र शिकण्याची संधी देते. आपल्यापेक्षा शारीरिक वा मानसिकदृष्ट्या क्षमता कमी असणाऱ्या मुलांना वर्गातील इतर मुलं सामावून, सांभाळून घेत माणुसकीची मूल्यं शिकत असतात. ‘अक्षरनंदन’मध्ये अनेक व्यक्तींना, संस्थांना भेट देऊन, शाळेत बोलावून त्यांना समजून घेण्याची संधी मुलांना दिली जाते. 

वेगवेगळ्या जातिधर्मातील, राज्यांतील, देशांतील चाकोरी बाहेरची कामं करणाऱ्या व्यक्तींशी होणारी देवाणघेवाण, त्यांच्या विचारसरणीची आणि त्यांच्या जीवन पद्धतीची ओळख मुलांना पुस्तकाबाहेरचं खूप काही शिकवून जाते. आपली मुलं पढिक न बनता कृतिशील नागरिक बनतील, यासाठी शाळा प्रयत्न करते. चौकटीत राहून, चौकटीबाहेरील शिक्षण हेही शाळेचं एक वैशिष्ट्य. शाळांच्या अनेक उपक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग असतो.

शाळेत वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सामाजिक प्रश्‍नांवर गप्पा, तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा होत असतात. मुलांनी प्रत्येक घटनेकडे, प्रसंगाकडे, विचारांकडे खुल्या दिलाने, सजगपणे पाहावे; वेगवेगळे अनुभव घ्यावेत, चाकोरी बाहेरचे जग पाहावे, वेगळ्या वाटा जोखाव्यात; आत्मभान जागृत ठेवावे, संवेदनशील माणूस बनावे हे शाळेचं मुख्य उद्दिष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com