सचोटी, प्रामाणिकपणा, नम्रता आणि कृतज्ञता!

Child
Child

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
माझ्या प्रिय मुला, वडील या नात्यानं तुला काय काय सांगावं, हा विचार करत असताना मला हे एकदम आठवलं. सचिन तेंडुलकरनं एका मुलाखतीत सांगितलेलं खूपच छान आहे. सचिननं भारताकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवलं. तेव्हा त्याच्या वडिलांनी, रमेश तेंडुलकरांनी सचिनला म्हटलं होतं, ‘क्रिकेट खेळून तू यश मिळवतो आहेस, हे आनंदाचंच आहे, पण विचार कर, किती वर्षे क्रिकेट खेळशील? पंधरा वर्षे, जास्तीत जास्त वीस वर्षे आणि माणूस म्हणून जगशील अंदाजे सत्तर वर्षे. याचा अर्थ क्रिकेट खेळणं, हा जीवनातला एक छोटा काळ आहे. तेव्हा यशानं माजू नकोस आणि अपयशानं खचू नकोस. माणूस म्हणून चांगला वाग, स्वभाव चांगला ठेव. लोकांनी तुला चांगल्या स्वभावाचा माणूस म्हणून लक्षात ठेवलं तर जास्त मोलाचं आहे.’ 

सचिननं वडिलांचे शब्द कायम स्मरणात ठेवले. त्यांनी म्हटलं होतं तसाच तो वागत राहिला. मैदानात कधी इतर खेळाडूंनी डिवचलं तरी तो शांतच राहिला. पंचांनी चुकीचं आउट दिल्याचं जाणवलं तरी त्यानं कधी बॅट आपटली नाही. धावा होत नव्हत्या तेव्हा ज्यांनी त्याच्यावर टीका केली, त्यांना त्यानं बॅटीनंच उत्तर दिलं. नम्र तर तो किती असतो, हे आपण बघतच असतो. कायम सचोटीनं वागण्याबद्दलच तो ओळखला जातो.

तसंच दुसरं उदाहरण आहे अमिताभ बच्चन यांचं. खरंतर केवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व त्याचं. त्याहूनही अधिक उत्तुंग यश मिळवूनही ते किती नम्र असतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आपण पाहतोच. समोरच्या अगदी सामान्य माणसांशीही ते किती अदबीनं आणि आदरानं बोलत असतात. ‘आपके प्यारने मुझे ये सन्मान दिया- वरना मैं अपने आपको इतने सन्मानके लिए काबिल नही समझता,’ असं ते विनयानं म्हणतात. चांगल्या माणसाची तशी खूप लक्षणं सांगता येतील, पण सर्वांत महत्त्वाची लक्षणं म्हणजे सचोटी, प्रामाणिकपणा, नम्रता आणि कृतज्ञता! 
- तुझा लाडका बाबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com