असे शिकवा मुलांना मनी मॅनेजमेंट

शिवराज गोर्ले
शनिवार, 15 जून 2019

मुलांना मनी मॅनेजमेंट आतापासूनच शिकवा.. 

बालक-पालक 

बहुतेक "बड्या बापांची पोरं' ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक समज असतो. तशी काही उदाहरणं आपण पाहतोही. पण.. 
पण अशी काही मुलं पित्याचं नाव अधिक उज्ज्वल करतात, समाजात स्वतःही प्रतिष्ठा मिळवतात, कृतज्ञता म्हणून समाजासाठी काही करतात, हेही आपण पाहतो. हे कसं होतं? त्यासाठी त्यांचे पालक काही विशेष दक्षता घेतात का? इलिन आणि जॉन गॅलो यांनी "सिल्व्हर स्पून किड्‌स' हे अतिशय "इंटरेस्टिंग' पुस्तक लिहिलं आहे. "हाऊ सक्‍सेसफुल पीपल रेज रिस्पॉन्सिबल चिल्ड्रेन' हे पुस्तकाचं उपशीर्षकही खूप बोलकं आहे. कसं वाढवतात ही मंडळी मुलांना, हे श्रीमंत पालकांच्या संदर्भात असलं, तरी सध्याच्या काळात मध्यमवर्गीय पालकही त्यातून खूप काही शिकू शकतात. त्यातल्या काही

"टिप्स' अशा : 
- मुलांनी पैशाच्या संदर्भात विचारलेले प्रश्‍न आस्थेनं, उत्सुकतेनं ऐका. शक्‍य ती उत्तरं द्या. पैशाचे व्यवहार गुपचूप करायचे असतात, असा त्यांचा समज होणार नाही, याची दक्षता घ्या. 
- "बाबा आपण श्रीमंत आहोत का हो?' या प्रश्‍नांवर टोलवाटोलवी करण्यापेक्षा "अरे, सुदैवानं आपण सगळे छान, व्यवस्थित राहू शकू आणि वेळ आली तर इतरांनाही मदत करू शकू, एवढा पैसा आहे आपल्याजवळ आहे,' असं छान उत्तर द्या. एखादं महागडं खेळणं परवडत असूनही ते तुम्ही त्याला देणार नसाल, तर "परवडत नाही' असं खोटं उत्तर देण्यापेक्षा, परवडत असूनही तुम्ही ते (आता तरी) का देणार नाही, हे समजावून द्या. 
- "नशीब लेका, तू आमच्यासारख्या पैसेवाल्यांच्या घरी जन्माला आलास, नाहीतर हे असलं खायला प्यायला जन्मात मिळालं नसतं,' हे "भाग्य' चुकूनही त्याच्या निदर्शनास आणू नका. दुसऱ्याबाबत बोलताना "पैशावर लोळताहेत लेकाचे' असं द्वेषानं किंवा असूयेनं बोलणं टाळा. 
- पैसा कमावणं हे पाप नव्हे, तो चांगल्या मार्गानंही कमावता येतो, सगळ्या पापाचं मूळ पैशात नसतं, ते पैशाची हाव धरण्यात असतं, हे मुलाला समजवा. 
- केवळ मित्रांवर रुबाब दाखवण्यासाठी त्याला "पार्ट्या' करू देऊ नका. 
- कितीही पैसा असला तरी शेवटी खर्चाला मर्यादा असते, हे त्याला कळू द्या. 
- सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तुमच्याकडं पैसा आहे म्हणून त्यानं बेजबाबदार झालं, बेफिकिरीनं वागलं तरी चालंल, असं त्याला वाटता कामा नये. 
अर्थात तुम्ही काय बोलता यापेक्षा पैशाच्या व्यवहारात कसं वागता, यावर सारं अवलंबून असतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Shivraj Gorle in Sakal Pune Today on money management